आकोट – संजय आठवले
आकोट शहरातील सुप्रसिद्ध अंबिका ज्वेलर्स चे मालक व नोकरावर जीवघेणा हल्ला करून त्यांचे कडील सुवर्णालंकारांचा ऐवज लुटणाऱ्या आणि तो ऐवज खरेदी करणाऱ्या अशा एकूण दहा लोकांना आकोट न्यायालयाने निर्दोष सोडले आहे.
आकोट सराफ बाजार येथील अंबिका ज्वेलर्सचे संचालक आनंद भोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या घटनेची हकीकत अशी कि, आनंद भोरे स्वतः व त्यांचे कनिष्ठ बंधू निलेश भोरे हे दिनचर्येनुसार १४ नोव्हेंबर २००९ रोजीचे रात्री ९ वाजता दुकान बंद करून घराकडे रवाना झाले. त्यांचे मागून सुवर्णालंकारांनी भरलेली बॅग व रोकड घेऊन त्यांचा सहाय्यक राहुल बुंदेले हा जात होता. अकस्मात काही अज्ञात लोकांनी चाकू आणि लोखंडी सळ्यांनी राहूलवर हल्ला चढविला. आणि त्याचे हातातील सुवर्णालंकारांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.
यादरम्यान आनंद भोरे पुढे निघून गेले होते. मात्र झटापटीच्या आवाजाने निलेश भोरे यांनी मागे वळून या लोकांचा प्रतिकार केला. मात्र लुटेऱ्यांचे हाती शस्त्रे असल्याने ते या दोघांवर भारी पडले. निलेश व राहुल यांना गंभीर जखमी करून लुटेरे बॅग हिसकाऊन पळून गेले. या तक्रारीवरून आकोट पोलिसांनी भादवी ३९४, ३९५, ३९७ अन्वये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. चौकशी दरम्यान पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतली असता लुटेऱ्यांनी काही ऐवज अन्य लोकांना विकल्याचे सांगितले.
त्यावरून पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. त्यांनाही याप्रकरणी आरोपी बनविण्यात आले. प्रकरणाचे पूर्ण चौकशीअंती आकोट न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. या संदर्भात चाललेल्या सुनावण्यांमध्ये एकूण १८ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये घायाळ झालेले निलेश भोरे, आरोपीची ओळख परेड करणारे अधिकारी, नायब तहसीलदार, तसेच लुटीचा ऐवज ओळखणारे सराफ यांचा समावेश होता.
या प्रकरणातील आरोपी अब्दुल हमीद, सुरेंद्र इंगळे, अब्दुल राजिक, चंद्रकांत सावळे, सुरज अग्रवाल, दुर्गाबाई इंगळे, राहुल भगत, दिनेश भंडारी व गणेश राजकोंडा यांचे वतीने एडवोकेट मिर्झा वसीम अहमद आणि त्यांचे सहाय्यक एडवोकेट अंजुम काजी आणि एडवोकेट आशिष चौबे यांनी बाजू मांडली. आपल्या युक्तीवादात पोलीस तपासात मोठ्या चुका झाल्याचे या विधीज्ञांनी न्यायालयाचे निदर्शनास आणले. त्यातच सरकारी साक्षीदारांच्या साक्षीही मजबूत नव्हत्या. त्यामुळे आरोपींना अपराधी सिद्ध करता येत नसल्याचे या विधिज्ञांनी सांगितले.
आपले कथनाचे पुष्ट्यर्थ त्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे दिशा निर्देशही न्यायालयासमोर सादर केले. यावर आकोट जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी या प्रकरणातील दहाही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.परंतु या संदर्भात जनमानसात मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसार आनंद भोरे यांनी याप्रकरणी अज्ञातांचे विरोधात तक्रार दिली. त्यावर तपास करून पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. नंतर त्यांना अटक केली. त्यांचेकडून ऐवज जप्त केला. त्या आरोपींनी अपराधाची कबुलीही दिली.
तरीही पोलीस तपासात व साक्षीदारांचे बयानात त्रुटी आढळल्या. त्यामुळे या त्रुटी सुधारून उच्च न्यायालयात अपील करण्यात यावे अशी जन मानसात चर्चा होत आहे. तपासातील त्रुटी व साक्षीदारांच्या बयानातील तफावतीने अपराधी अशाच प्रकारे निर्दोष होत राहिले तर अपराध्यांचे मनोबल वाढेल. ज्याचे समाजावर अनिष्ट परिणाम होतील. तसे होऊ नये म्हणून अपील करून या अपराध्यांना शिक्षा होणे संदर्भात पावले उचलली जावीत असे शहरात बोलले जात आहे.