आकोट – संजय आठवले
प्रत्यक्ष निवडणूक प्रचार सुरू झाल्याने आकोट तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भलतीच चुरस निर्माण झाली असून वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरीत विविध पॅनल द्वारे लढविल्या जात असलेल्या या निवडणुकीत आता तीन राजकीय पक्षांच्या महाविकास आघाडी या नावाचा उल्लेख केला जात आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी हा एकमेव राजकीय पक्ष वगळता अन्य कोणताही राजकीय पक्ष एके ठिकाणी एकवटलेला नसल्याचे वास्तव आहे.
त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उल्लेख अनेकांच्या भुवया उंचावण्याचे निमित्य ठरला आहे. आकोट तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा इतिहास पाहू जाता आतापर्यंत एकाही निवडणुकीत राजकीय पक्षांच्या नावावर मते मागण्यात आलेले नाहीत. यासोबतच दोन पेक्षा अधिक पॅनल्स या निवडणूक रिंगणात कधीच उतरलेले नाहीत. परंतु या वेळच्या निवडणुकीत मागील साऱ्या रूढी परंपरांना छेद दिला जात असल्याचे चित्र दिसत आहे.
कधीकाळी ‘तुझ्या गळा माझ्या गळा घालून मोतीयांच्या माळा’ म्हणणारे आज तितक्याच त्वेषाने परस्पर विरोधात समशेरी परजीत असल्याचे दिसत आहे. शेतकरी हिताची उबळ असह्य झाल्याने एकाच राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी वेगवेगळ्या पॅनल्स मध्ये विखुरले गेले आहेत. राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या या भूमिकेमुळे कोणतेही पॅनल कुण्या एका राजकीय पक्षाचे नाव अधिकारवाणीने उच्चारू शकत नाही.
मात्र वंचित बहुजन आघाडी याला अपवाद ठरली आहे. कोणतीही निवडणूक पक्षाचे नावावरच लढवायची असे धोरण या पक्षाने स्वीकारलेले आहे. त्यामुळे थेट पक्षाचे नावावर वंचित आघाडी या निवडणुकीत उभी ठाकली आहे. या पक्षाची दरोमदार दलित मतांवर आहे. मात्र ही सारी मते वंचितलाच जातील याची शाश्वती नाही. त्याचे कारण आहे. ते असे कि, यातील बहुतांश मते ग्रामीण भागातील आहेत. गाव लहानसे असल्याने तेथील सर्व लोक एकमेकांशी संलग्न असतात.
वर्षभर एकमेकांच्या अडीनडीला हातभार लावित असतात. त्यामुळे सहानुभूतीच्या एका धाग्याने हे लोक एकमेकांशी घट्ट विणलेले असतात. म्हणून मग ‘आपण एकमेकांना वर्षभर चालवितो, खासदारकी आमदारकीची गोष्ट वेगळी, ही गोष्ट वेगळी.’ या समजूतदारीने ही मते अन्यत्र खेचली जाऊ शकतात. मात्र ‘बाळासाहेब खतरे मे है. त्यांना वाचवायचे असेल तर एकत्र या’. अशी भावनिक साथ घालण्यात वंचित नेते सफल झाले तर ही मते स्थिरही राहू शकतात.
पण वंचित आघाडी हे अर्ध पॅनल आहे. त्यांनी कास्तकार पॅनलशी पाट लावला आहे. त्यामुळे वंचितांना कास्तकार पॅनललाही सोबत घेऊन जावे लागणार आहे. या लढाईत सहकार पॅनल हे सर्वाधिक जुने पॅनल आहे. अनेक वर्षांच्या अनुभवाने सहकार नेते अतिशय धूर्त, मुरब्बी आणि मुत्सद्दी बनलेले आहेत. या पॅनल मधील बहुतांश लोक राष्ट्रवादी काँग्रेसचे धूरिणत्व करतात. परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजपाच्या नेते, कार्यकर्त्यांची यांच्याशी सांगड आहे.
शेतकरी संघटना, प्रहार सारख्या राजकीय पक्षांचे, संघटनांचे लोकही या पॅनलमध्ये सहभागी आहेत, त्यामुळे हे पॅनल कोणत्याही एका राजकीय पक्षाचे अथवा महाविकास आघाडीचे कुंकू लावू शकत नाही. लावले तर ते सहकार नेत्यांना परवडणारे नाही. या पॅनलचा कडवा प्रतिद्वंद्वी म्हणून शेतकरी पॅनलचा नामोल्लेख होतो. सहकार नेत्यांच्या कट्टर विरोधकांची मोट बांधून हे पॅनल जोर आजमावत आलेले आहे. शिवसेना माजी आमदार संजय गावंडे हे या पॅनलचा मेळीचा खांब आहेत.
त्यांच्यासोबत काँग्रेस, भाजप या राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आहेत. कालपर्यंत वंचितचेही काही नेते, कार्यकर्ते या पॅनल सोबत होते. परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी ‘वंचितच्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हा रे’ असा फतवा काढताच हे लोक तिकडे गेले आहेत. वास्तवात गावंडे हे ठाकरे गटाशीच प्रमाणिक आहेत. त्यांचे बहुतांश नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांचे सोबतच आहेत. परंतु सर्व पक्षातील मंडळी या पॅनलमध्ये असल्याने हे पॅनलही महाविकास आघाडीचे नावे नाही तर शेतकरी पॅनलच्या नावे मते मागताना दिसत आहे.
जय किसान पॅनलचा विचार केल्यास हे पॅनल एक खांबी तंबू असल्याचे जाणवते. या एक खांबी तंबूचे नेते गजानन पुंडकर हे बाजार समितीचे मुख्य प्रशासक राहिलेले आहेत. त्याकरिता त्यांनी प्रहार या राजकीय पक्षात प्रवेश घेतलेला होता. त्याच गुणवत्तेवर ते मुख्य प्रशासक बनविले गेले. परंतु वाद आणि गजानन पुंडकर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने त्यांची कारकीर्द कायम वादग्रस्तच राहिली. त्यातच ते त्यांच्या प्रहार पक्षाच्या प्रशासकांनाही सोबत ठेवू शकले नाहीत.
त्यामुळे त्यातील एक सहकार तर दुसरा कास्तकार पॅनलमधून निवडणूक लढवीत आहे. पुंडकर हे सद्यस्थितीत प्रहारचे असले तरी त्यांनी आपल्या पॅनलला ते नाव दिलेले नाही. परंतु नव्यानेच उभे झालेले कास्तकार पॅनल मात्र याला अपवाद ठरले आहे. या पॅनलने चक्क महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे नावे आपला वचननामा प्रकाशित केला आहे. वास्तव पाहू जाता महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना (ठाकरे), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आहेत.
शिवसेनेचे शहर, तालुकाप्रमुख व अन्य पदाधिकारी शेतकरी पॅनल सोबत आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आजी-माजी तालुका अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर व तालुका अध्यक्ष हे सहकार पॅनल सोबत आहेत. जिल्हास्तरावरून त्यांना या निवडणुकीबाबत कोणतेही आदेश आलेले नाहीत. कुणाशी युती झाल्याचेही सांगण्यात आलेले नाही. कुणाचे काम करावे याचाही संदेश नाही. त्यामुळे कास्तकार पॅनलच्या या वचननाम्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.
त्यातच महाविकास आघाडी हे नाव देऊनही या वचननाम्यावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही नेत्याचे छायाचित्र नाही. केवळ उद्धव ठाकरे आणि एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांचीच छायाचित्रे आहेत. त्यातच महत्त्वाचे म्हणजे एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांची केवळ उद्धव ठाकरे यांचेशीच युती झालेली आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत त्यांचे अंतर होते त्याच प्रमाणात आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारीच कास्तकार पॅनल सोबत नसताना महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी युती हे समीकरण एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनाही नापसंत असेल असा राजकीय होरा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी युती हा उल्लेख या पॅनलने कोणत्या आधारावर केला? या प्रश्नाने अनेक राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.