Adani meets Pawar : उद्योगपती गौतम अदानी यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (JPC) चौकशी करण्याच्या विरोधकांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर अदानी-पवार यांची ही भेट झाली असावी असा अंदाज राजकीय विश्लेषक करीत आहे.
गुरुवारी सकाळी पवार यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी दोघांमध्ये सुमारे दोन तास बंद दाराआड चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या महिन्याच्या सुरुवातीला शरद पवार यांनी अदानी समूहाचे समर्थन करत अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालावर टीका केली होती.
महाविकास आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेत शरद पवार यांनी अदानी समूहावरील आरोपांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची बाजू घेतली होती. संसदेत संख्याबळाच्या आधारे जेपीसीमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे बहुमत असेल आणि त्यामुळे अशा चौकशीवर शंका निर्माण होईल, असे ते म्हणाले होते.
अदानी समूहावरील आरोपांची JPC चौकशी करण्याच्या विरोधी पक्षांच्या मागणीशी त्यांचा पक्ष सहमत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिमोने नंतर सांगितले होते. हिंडेनबर्ग रिसर्चने या व्यवसाय समुहावर फसवे व्यवहार आणि शेअर-किंमत फेरफार यासह अनेक आरोप केले आहेत. दुसरीकडे, अदानी समूहाने हे आरोप खोटे असल्याचे फेटाळून लावले आहे.