Thursday, October 24, 2024
Homeराजकीयपुलवामा स्फोटावर नरेंद्र मोदींनी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करु...

पुलवामा स्फोटावर नरेंद्र मोदींनी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करु :- नाना पटोले…

प्रदेश काँग्रेसचे राज्यभर ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ आंदोलन.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली पुण्यात आंदोलन.

मुंबई – जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेवर जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून भूमिका मांडलेली नाही. एवढ्या मोठ्या व अत्यंत गंभीर प्रश्नी देशाच्या पंतप्रधानांनी गप्प बसणे योग्य नाही, म्हणूनच काँग्रेस पक्षाने ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारला आहे. पुलवामा प्रकरणी नरेंद्र मोदींनी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

पुलवामा स्फोट प्रकरणी सत्यपाल मलिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा करावा या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, पुलवामा स्फोटात सीआरपीएफचे ४० जवान शहिद झाले पण या प्रकरणाचा तपास अजून झालेला नाही.

या स्फोटासाठी ३०० किलो आरडीएक्स वापरण्यात आले त्याचाही तपास झालेला नाही. पंतप्रधान मोदी यांनी या घटनेचे २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत भांडवल केले. या घटनेत सरकारची चूक आहे असे त्यावेळचे राज्यपाल सत्यपाल मलिक सांगत असताना त्यांना गप्प राहण्यास का सांगितले? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे नरेंद्र मोदींना द्यावी लागणार आहेत पण हे हुकूमशाही सरकार उत्तर देण्याचे टाळत आहेत.

नरेंद्र मोदींचे मौन जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत आहे म्हणून देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने, ४० जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून भाजपा व मोदींना जाब विचारत आहे.

उद्योगपती अदानीने जनतेच्या घामाचा पैसा लुटला त्याचा हिशोबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावा लागणार आहे. २० हजार कोटी रुपये कुठून आले व मोदी-अदानी संबंध काय? याचेही उत्तर मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष हा लढा थांबवणार नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. शर्म करे मोदी शर्म करो, हे आंदोलन पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धुळे सह राज्यातील सर्व जिल्ह्यात करण्यात आले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: