तेल्हारा तालुक्यातील बेलखेड गावाचे परिसरात एका काळतोंड्या माकडाने मोठा हैदोस घातला होता. त्याने अनेक लोकांवर हल्ला चढवून त्यांना घायाळ केले होते. त्यामुळे या परिसरात या माकडाची चांगलीच दहशत निर्माण झाली होती. लहान बालके व महिला यांना तर एकटे दुकटे फिरणे कठीण झाले होते. त्यातच वन्य प्राणी संरक्षण कायदा आडवा येत असल्याने त्या माकडास कुणी प्रतिबंध ही करू शकत नव्हते.
अशा स्थितीत वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक एस. पी. राऊत, वनरक्षक चंदू तायडे, डी.जे. इंगळे, सोपान रेळे, राहुल बावणे, विकास मोरे, स्वप्नील टाले, अनिल चौधरी यांनी अथक प्रयास करून या काळतोंड्या माकडास पकडण्यात यश मिळविले. पकडल्यानंतर या माकडास पेयजलाची व्यवस्था असलेल्या जंगलातील ठिकाणी सुरक्षित सोडून देण्यात आले आहे.