Weather Update : राज्यात पुढील चार दिवसांत जोरदार गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढग दाटून आले असून काही भागात आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर 7 एप्रिल रोजी काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान विभागाचे K S Hosalikar यांनी ट्वीट करून माहिती शेयर केली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रोजी विदर्भातील तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे. त्यामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील डोंगराळ भागात पावसाची शक्यता अधिक असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
7 एप्रिल रोजी काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, बीड,पुणे, जालना, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, जळगाव, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, गोंदिया वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 8 एप्रिलला 6 जिल्हे सोडून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.