Saturday, September 21, 2024
Homeराज्यअदानी उद्योगातील २० हजार कोटी रुपयांची चौकशी करण्याची हिम्मत मोदींनी दाखवावी :-...

अदानी उद्योगातील २० हजार कोटी रुपयांची चौकशी करण्याची हिम्मत मोदींनी दाखवावी :- नाना पटोले…

राहुल गांधींवरील कारवाई राजकीय आकसातून, लोकशाही संपण्याचा दिशेने देशाची वाटचाल :- बाळासाहेब थोरात

सत्ताधारी भाजपाकडून लोकशाहीची गळचेपी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला :– अशोक चव्हाण

काँग्रेस पक्ष जनतेच्या दरबारात जाऊन भाजपा सरकार विरोधात आवाज उठवेल :- पृथ्वीराज चव्हाण

अदानी-मोदी भ्रष्ट युतीचा काँग्रेसकडून राज्यातील सर्व जिल्ह्यात पर्दाफाश.

मुंबई – मोदी सरकारने मागील ९ वर्षात मित्रोंसाठी काम करत जनतेचा पैसा त्यांच्या खिशात घालण्याची व्यवस्था केली आहे. देशातील सर्व सरकारी उद्योग, कंत्राटे फक्त अदानींनाच बहाल केली आहेत. अदानी समुहात २० हजार कोटी रुपये शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवण्यात आले आहेत. हा पैसा कुठून आला? हाच प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. हे २० हजार कोटी रुपये कुठून आले ? याची चौकशी करण्याची हिम्मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

मोदी-अदानी भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषदा घेतल्या. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ठाणे येथे बोलत होते. विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात अहमदनगर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण परभणी, पृथ्वीराज चव्हाण पुणे, तर सांगलीत विधान परिषद गटनेते आ. सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.

प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान पालघर, आ. कुणाल पाटील नाशिक, बस्वराज पाटील धाराशिव, यवतमाळ शिवाजीराव मोघे, पिंपरी चिंचवड आ. प्रणिती शिंदे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी चंद्रपूर येथे तर माजी मंत्री, आमदार यांनी इतर जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन देशातील परिस्थिती विषद केली.

यावेळी नाना पटोले पुढे म्हणाले की, निरव मोदी, ललित मोदी, विजय माल्या या चोर, दरोडेखोरांनी जनतेचा पैसा लुटुन परदेशात पळाले. निरव मोदी व ललित मोदीला चोर म्हटल्याने राहुल गांधीना मानहानीच्या प्रकारणात सुरतच्या कोर्टाने शिक्षा दिली व त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची खासदारकी भाजपा सरकारने रद्द केली. हे सर्व भाजपाकडून ठरवून केले आहे.

मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवला, मोदी-अदानी भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केला म्हणून राहुल गांधींवर सुडबुद्धीने कारवाई केली. राज्यातील जनतेला या हुकूमशाही कारभाराची माहिती मिळावी म्हणून राज्यभर पत्रकार परिषदांच्या माध्यमातून माहिती देण्याची काम काँग्रेस करत आहे.

अहमदनगर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशातील परिस्थिती चिंतानजक असून लोकशाही आहे की नाही अशी परिस्थीती आहे. राहुल गांधी यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई केली आहे. संसदेत बोलू दिले जात नाही, नेतृत्वांचा आवाज लोकशाहीत दाबला जात आहे. लोकशाहीत मतमतांतरे होत असतात, हेच निरोगी लोकशाहीचे लक्षण आहे पण भाजपाकडून तेच होऊ दिले जात नाही, हे सर्व लोकशाही संपण्याच्या दिशेने जात आहे.

राहुल गांधी यांनी अदानी समुहात २० हजार कोटी रुपये कुठून आले? हा प्रश्न विचारून त्याची चौकशी झाली पाहिजे ही माफक अपेक्षा व्यक्त केली होती पण भाजपा सरकारने मात्र आकसाने कारवाई करून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. भाजपा सरकारच्या अत्याचाराची माहिती काँग्रेस पक्ष राज्यभर विविध आंदोलनाच्या माध्यमातून देत आहे. आज सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषदा घेण्यात आल्या आहेत, यापुढे तालुका पातळीवरही भाजपा सरकारच्या कारवायांची माहिती दिली जाईल.

पुणे येथे बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सरकारला जाब विचारणे हे विरोधी पक्षाचे मुलभूत कर्तव्य असते, त्या कर्त्यव्यापासून काँग्रेस नेत्यांना संसदेत प्रतिबंधित करण्यात आले म्हणून प्रसार माध्यमांच्या मदतीने माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. गौतम अदानी हे महाठग आहेत असा आरोप हिंडनबर्गच्या अहवालात करून अदानीने खोटी माहिती देऊन सरकारकडून दबाब आणून अदानीने समुह मोठा केला असाही आरोप यात करण्यात आला आहे.

संसदेत राहुल गांधी यांनी हा प्रश्न उपस्थित केला. गौतम अदानी- मोदी यांचा काय संबंध आहे ? बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून अदानी समुहात २० हजार कोटी कोणाचे आले ही विचारणाही राहुल गांधी यांनी केली. पण भाजपा सरकारने राहुल गांधींचे संसदेतील भाषणच काढून टाकले. त्यानंतर जुन्या खटल्याचे प्रकरण बाहेर काढून त्यांना शिक्षा झाली. शिक्षेनंतर लगेच खासदारकी रद्द करण्यात आली. हा मनमानी कारवाई आहे, त्याविरोधात काँग्रेस पक्ष जनतेच्या दरबारात जाऊन सरकारविरोधात आवाज उठवेल, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

परभणी येथे बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, निरव मोदी, ललित मोदी यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलताना राहुल गांधींच्या एका वक्तव्याचा आधार घेत त्यांच्यावर भाजपाचा एक आमदार सुरतच्या न्यायालयात केस दाखल करतो त्यातून राहुल गांधी यांना शिक्षा होते व लगेच त्यांची खासदारकी रद्द केली जाते, सरकारी घर खाली करण्याची नोटीस दिली जाते.

भाजपा सरकारला अदानीच्या भ्रष्टाचारावर प्रश्न विचारल्यानेच राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली आहे. भाजपा सरकार विरोधकांचा आवाज दडपत असून हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला आहे. सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीची गळचेपी केली जात आहे, असे प्रकार काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही. भाजपाच्या दादागिरीला चोख उत्तरे देऊ, असा इशाराही चव्हाण यांनी दिला. ठाण्यात पत्रकार परिषदेच्या आधी आंदोलन करण्यात आले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: