अकोला : मूर्तिजापूर शहरातील माजी नगरसेवक मनोज शर्मा यांच्यावर 4 जून 2014 रोजी अग्रसेन चौकात मनोज शर्मा यांच्यावर 8 आरोपींनी प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला होता. घटनेदरम्यान बचावासाठी गेलेले राम जोशी यांनाही आरोपींनी जखमी केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या मनोज शर्मा यांना पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता तत्कालीन परिविक्षाधीन एएसपी प्रवीण मुढे पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे, गजानन पडघन यांनी या घटनेचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी या घटनेत सहभागी असलेल्या 6 आरोपींना कलम 302 अन्वये दोषी ठरवले.
सोमवारी दोषारोप सुनावल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपी बबन वामनराव शितोळे, गणेश वसंतराव शितोळे, नामदेव बबन शितोळे, कपिल रतन शितोळे, प्रमोद शेषराव चव्हाण, पंकज नामदेवराव निळकंठ यांना दोषी ठरवून कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा, दंड व दंडाची शिक्षा सुनावली. कलम 307 मध्ये जन्मठेप, प्रत्येकी 10 हजार रुपये दंड कलम 148 अन्वये 2 वर्षांची शिक्षा, प्रत्येकाला 5,000 रुपये दंड भरण्याचे आदेश दिले. दोन आरोपींना संशयाचा फायदा देऊन सोडून देण्यात आले.
कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान मूर्तिजापूर शहराचे पोलिस निरीक्षक सचिन यादव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सरकारी पक्षातर्फे अधिवक्ता आर.आर.देशपाडे यांनी काम पाहिले. या हल्ल्यातील मृत व जखमींना नुकसान भरपाईचा प्रस्ताव तयार करून तो विधी सेवा प्राधिकरणाकडे सादर करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले.
न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत आम्ही पुर्ण समाधानी आहोत परंतु उर्वरित फरार आरोपींना पोलिसांनी शोधून गजाआड करावे , फरार आरोपी मोकाट असल्याने आमच्या जिवीतास कायम धोका आहे….राम मोहनलालजी जोशी (फिर्यादी ) मुर्तिजापूर