आ. संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करून लावले मुर्दाबादचे नारे.
पेन्शन देण्याची ऐपत नसलेल्या सरकारकडे जी – २० साठी कोट्यवधीची कृत्रिम सौंदर्य व रोषणाई कशासाठी ? कर्मचाऱ्यांचा सवाल….
नागपूर – शरद नागदेवे
नागपूर – राज्य कर्मचारी संघटना व इतर कर्मचारी संघटनांनी एकच “मिशन जुनी पेन्शन”च्या मागणीसाठी आजचा सातवा दिवस असून आज गगनभेदी थाळी नाद आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात जिल्हा परिषदेच्या सर्व १०० टक्के कर्मचाऱ्यांनी हजेरी लावून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जोरदार थाळी नाद व घोषणाबाजी केली. यात सर्व कर्मचारी संघटनांचा सहभाग होता.
तत्पूर्वी कर्मचाऱ्यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आज सर्व कर्मचाऱ्यांनी गगनभेदी थाळी नाद आंदोलन करून परिसर दणाणून सोडला. बुलढाणा जिल्ह्यातील आ. संजय गायकवाड यांनी सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्याबद्दल त्यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला व आ. संजय गायकवाड यांच्या मुर्दाबादचे नारे लावण्यात आले.
तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करून त्यांचा “कसबा” करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. नागपूर येथे जी – २० अंतर्गत सी – २० परिषद आयोजित करण्यात आलेली आहे भारत या परिषदेचे अध्यक्षपद भूषवित आहे ही अभिमानाची बाब आहे. मात्र पेन्शन देण्याची ऐपत नसताना कोट्यवधीचे कृत्रिम सौंदर्य व रोषणाई कशासाठी करण्यात येत आहे व श्रीमंती का दाखविण्यात येत आहे असा सवाल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
काही विभाग प्रमुख कर्मचाऱ्यांना दूरध्वनी करून काम करण्यास दबाव टाकत आहे. एक विभाग प्रमुख तर रात्री बेरात्री पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना फोन करून कामावर येण्यास बाध्य करीत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
एकीकडे आंदोलनाला पाठिंबा द्यायचा दुसरीकडे कामावर येण्यासाठी दबाव टाकायचा या विभाग प्रमुखाच्या दुटप्पी भूमिकेचा कर्मचारी संघटनेने निषेध केला. या नंतर कोणत्याही विभाग प्रमुखाने कर्मचाऱ्यांवर दबाव टाकल्यास त्या विभाग प्रमुखांच्या नावाने नारे निदर्शने करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
आज आंदोलनस्थळी जिल्हा परिषदेचे सदस्य सलील देशमुख यांनी भेट देऊन संबोधित केले व त्यांचा व राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला तसेच पक्षाचे वरिष्ठ नेत्यांमार्फत शासन दरबारी मागणी पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
आजच्या आंदोलनात ज्यांनी नेतृत्व केले त्यामध्ये अरविंद अंतूरकर, डॉ. सोहन चवरे, सुदाम पांगुळ, गोपीचंद कातुरे, अरविंद मदने, संजय तांबडे, सुजित अढाऊ, विजय बुरेवार, संतोष जगताप, किशोर भिवगडे, अक्षय मंगरुळकर, सुभाष पडोळे, नाना साळवे, जयंत दंढारे, योगेश राठोड, निरंजन पाटील, उमेश जायेभाये, योगेश हरडे, संगीता चंद्रिकापुरे, रंजना कांबळे, अलका खंते, हेमा सुरजुसे आदी कर्मचारी नेत्यांचा सहभाग होता.