आकोट – संजय आठवले
अकोला येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा विशेष न्यायाधिश सुनिल पाटील यांनी अप.क्र. ७३/२०२३ कलम ७ भष्ट्राचार अधिनियम ८८ मधील आरोपी वैभव फुलचंद जोहरे वय वर्ष २९ तहसिल कार्यालय तेल्हारा येथील महसूल सहाय्यक याने रेती व्यावसायिकास तीस हजार रुपये लाच मागणी केल्याचे आरोपात त्याची दि.१८.३.२०२३ पर्यंत लाच प्रतिबंधक विभाग अकोलाचे पोलीस कोठडीमध्ये रवानगी केली आहे.
या प्रकरणाची थोडक्यात हकीगत अशी आहे की, तेल्हारा येथील एक २४ वर्षीय युवक रेती वाहून नेण्याचा व्यवसाय करीत होता. तो व्यवसाय सुरळीत चालविण्याकरिता तेल्हारा तहसील कार्यालयातील वैभव जोहरे या लिपिकाने व्यावसायिकाकडे तीस हजार रुपये लाच मागणी केली.
त्यावर व्यावसायिकाने लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांचे पडताळणीमध्ये जोहरे याने लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यावरून लाच प्रतिबंधक विभाग अकोला चे पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार यांनी शेगांव नाका तेल्हारा जि. अकोला येथे आरोपी वैभव जोहरे यास दि. १७.३.२०२३ चे रात्री अटक केली. त्यानंतर विद्यमान कोर्टासमोर वरील आरोपीला हजर केले.
या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजीत देशमुख यांनी युक्तीवाद केला कि, आरोपी हा महसूल कार्यालय तेल्हारा येथे लोकसेवक आहे. या प्रकरणातील तेल्हारा येथील फिर्यादी याला रेतीची वाहतुक ट्रॅक्टरमधून करण्याकरीता ३०हजार रु. लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात आरोपी वैभव जोहरे याचे नैसर्गीक आवाजाचे नमुने परिक्षण करण्याकरीता घेणे बाकी आहे. तसेच या प्रकरणात साक्षीदारांचे जाबजबाब नोंदविणेही बाकी आहे. तसेच या प्रकरणात आणखी इतर कोणाचा सहभाग आहे किंवा कसे या बाबत सखोल तपास करणे बाकी आहे.
त्यामुळे वरील प्रकरणात आरोपीतास पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश करण्यात यावा. अशी विनंती सरकार तर्फे सरकारी वकील अजीत देशमुख यांनी केली. तर आरोपी तर्फे अॅड. प्रदिप हातेकर यांनी युक्तीवाद केला. दोन्हीपक्षाचे युक्तीवादा नंतर वि. न्यायालयाने आरोपीस वरील प्रमाणे पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.