• गडचिरोली जिल्हा पोलीस दल व मैत्री परिवार संस्थेचा पुढाकार
• 8 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसह 127 आदिवासी जोडपी होणार विवाहबद्ध
गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकी आणि मैत्री परिवार संस्था नागपूर व गडचिरोली शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या, 26 मार्च 2023 रोजी गडचिरोली येथे भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर रोडवरील अभिनव लॉन येथे सकाळी १० वाजता होणाऱ्या या विवाह सोहळ्यात आत्मसमर्पण केलेल्या 8 नक्षलवाद्यांसह 127 आदिवासी युवक-युवती विवाहबद्ध होणार आहेत.
मैत्री परिवार संस्था ही मागील दीड दशकापासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहेत. मैत्री परिवारने गडचिरोली जिल्हा दत्तक घेतला असून पोलीस विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील विविध भागात दिपावली सण साजरा करण्यासोबतच, कपडे वाटप, वैद्यकीय शिबिरे, शैक्षणिक उपक्रम, रोजगार मेळावे राबवले जातात.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील युवक-युवतींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने व नक्षलवादामुळे भयग्रस्त या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी, दहशतमुक्त व हिंसामुक्त सामाज निर्माण करण्याच्या हेतुने 2018 साली पहिल्यांदा सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला. याआधी, नागपूर व अहेरी येथे प्रत्येक एक व गडचिरोली येथे दोन सामूहिक विवाह सोहळे घेण्यात आले. त्यात आतापर्यंत 15 आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांसह एकुण 433 आदिवासी युवक-युवतींचे विवाह पार पडले.
येत्या, 26 मार्च 2023 रोजी गडचिरोली येथे होणा-या या पाचव्या सामूहिक विवाह सोहळ्याला गडचिरोली व नागपूर येथील अनेक मान्यवर, गडचिरोली पोलीस दलाचे अधिकारी आणि मैत्री परिवार संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वधू-वरांना आशीर्वाद द्यावा, असे आवाहन गडचिरोली पोलीस दल व मैत्री परिवार संस्थेने केले आहे.
8 आत्मसर्पित नक्षलवादी मुख्य आकर्षण
या सामूहिक विवाह सोहळ्यात एकुण 127 आदिवासी युवक-युवतींचे विवाह होणार असून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या 8 नक्षलवादी जोडप्यांचे विवाह हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. 3500 लोकांची बसण्याची क्षमता असलेला भव्य डोम या भव्य सोहळ्यासाठी ५०० बाय ८० चौरस फूटाचा भव्य डोम उभारण्यात येत आहे.
यात 3500 लोकांच्या बसण्याची व्यवस्था राहणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या या उपवर-वधूंची 10 झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यात उपवर-वधू आणि त्यांच्या नातेवाईकांची बसण्याची व्यवस्था राहील. आत्मसमर्पित नक्षलवादी उपवर-वधूंसाठी ‘नवजीवन’ हा स्वतंत्र झोन तयार करण्यात आला आहे.
विविध मंडपांना शूरविरांची नावे
विवाहस्थळी चार वेगवेगळ्या आकाराचे मंडप उभारले जात आहेत. प्रत्येक मंडपाला आदिवासी जमातीतील दैवत व शूरविर पुरुषांची नाव देण्यात येणार आहे. मुख्य मंडपाला वीर बिरसा मुंडा यांचे नाव तर आदिवासी बांधवांच्या भोजनकक्षाला क्रांतिवीर बाबुराव शेडमाके आणि मान्यवरांच्या भोजनकक्षाला वीर नारायण सिंह यांचे नाव देण्यात येणार आहे. वधू-वरांच्या भोजन कक्षाला वीर राणी दुर्गावती यांचे नाव देण्यात येईल.
सामूहिक विवाह सोहळ्याची वैशिष्ट्ये
- आदिवासी परंपरेनुसार विवाह सोहळा पार पडेल.
- नवदाम्पत्याच्या माता-पित्यांना आहेर भेटवस्तू
- नवदाम्पत्यासह त्यांच्या ११ नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था
- वधूला सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे आणि सांसारिक साहित्य
- नवदाम्पत्यांशी वर्षभर संपर्कात राहून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
- नवविवाहित जोडप्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.