आकोट – संजय आठवले
जुन्या पेन्शनकरिता सुरू झालेल्या कर्मचारी संपाचा आकोट न्यायालय व नगरपरिषद वगळता सर्वच विभागांच्या कामकाजावर झालेला परिणाम आज चौथ्या दिवशी ठळकपणे दिसून आला असून आज सर्व शासकीय विभागांच्या कर्मचाऱ्यांनी आकोट तहसील कार्यालयासमोर एकत्रितपणे निदर्शने केली. त्यात महिला कर्मचाऱ्यांचा लक्षवेधी सहभाग दिसला. या साऱ्या आंदोलनावर पोलीस विभागातर्फे बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे.
संपूर्ण राज्यभर जुन्या पेन्शनकरिता राज्य शासनाच्या सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून संप पुकारलेला आहे. त्या संपाचा आकोट तालुक्यातील शासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. आकोट न्यायालय व नगरपरिषद वगळता जवळजवळ सर्वच विभागांच्या कार्यालयांना कुलूपबंद करण्यात आले आहे.
न्यायालयीन कर्मचाऱ्यांना संपावर जाता येत नाही. त्यामुळे आकोट न्यायालयातील गट क दर्जाच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या संपाला आपले नैतिक समर्थन दिले आहे. महाराष्ट्र राज्य न्यायालय कर्मचारी महासंघ गट क च्या मुंबई येथे झालेल्या सभेत पारित ठरावानुसार काळ्या फिती लावून कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे. संघटना अध्यक्ष आर. के. नरसीकर यांचे आदेशाने हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.
तर नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या एका संघटनेने संपातून काढता पाय घेतल्याने आकोट नगर परिषद कर्मचारी कामावर परत आले आहेत. त्यामुळे आकोट न्यायालय व नगर परिषदेचे कामकाज सुरळीतपणे सुरू असून अन्य विभागाची कामे मात्र पूर्णपणे ठप्प पडलेली आहेत. परिणामी सर्वच विभागांमध्ये संपाच्या चौथ्या दिवशी शुकशुकाट बघावयास मिळाला.
यादरम्यान विविध संघटनांच्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार शहरातील सर्वच शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आकोट तहसील कार्यालयासमोर एकत्रितपणे निदर्शने केली. यामध्ये जिल्हा परिषदेचे सर्वच विभाग, कोषागार , भूमी अभिलेख, कृषी, दुय्यम निबंधक मुद्रांक शुल्क, आरोग्य, शिक्षण, मृद व जलसंधारण आदी सर्वच विभागांच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
या आंदोलनात वेगवेगळ्या विभागांची दिवसागणित नव्याने भर पडत आहे. त्या अनुषंगाने आकोट ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय प्रयोगशाळा कर्मचारी आजपासून संपात उतरले आहेत. तलाठी व मंडळ अधिकारी यांनी २० मार्चपासून संपात सामील होण्याची घोषणा केली आहे. तर २८ मार्चपासून राजपत्रित वैद्यकीय अधिकारी, राजपत्रित महसूल अधिकारी संपात दाखल होणार आहेत.
अशा स्थितीत सर्वच विभागांद्वारे अशी पावले उचलली जात असल्याने सर्व शासकीय विभाग एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने कामकाजातून अंग काढून घेत आहेत. त्यामुळे हळूहळू नागरिकांची कुचुंबणा होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना अद्यापही या संपाची कल्पना नसल्याने अनेक ग्रामस्थ शासकीय कार्यालयातून हात हलवीत परतताना दिसत आहेत. असे जाताना, “हा संप कधी मिटणार हो?” हा एकच प्रश्न त्यांच्या भाबड्या ओठातून बाहेर पडत आहे.
अशा अवस्थेत प्रत्येक विभागाने आपापल्या कार्यालयासमोर बैठक मांडली आहे. त्यातच दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. अशा काळात प्रत्येक ठिकाणी हजेरी लावताना पोलीस विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे फिरत्या गस्ती पथकाद्वारे पोलीस विभागाने या आंदोलनावर करडी नजर ठेवली असून कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही याची दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती आकोट शहर ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी दिली.