जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकड्डे यांच्या उपस्थितीत “मेस्मा” कायद्याची होळी.
पेन्शन आढाव्यासाठी नियुक्त त्रिसदस्यीय समितीचा जीआर व कर्मचाऱ्यांना बजावलेल्या नोटीसचीही होळी.
नागपूर – शरद नागदेवे
नागपूर :- राज्य कर्मचारी संघटना व इतर कर्मचारी संघटनांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे व इतर सेवा विषयक मागण्यासाठी १४ मार्च पासून बेमुदत संप पुकारला आहे.संपाच्या दुसऱ्या दिवशीही जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा १०० टक्के प्रतिसाद मिळाला. आज सकाळी १० वाजता पासून “एकच मिशन जुनी पेन्शन” साठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करून जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडला. यात सर्व कर्मचारी संघटनांचा सहभाग होता.
तत्पूर्वी अंदोलनकर्त्यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.आज संपकरी कर्मचाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाईची तरतूद असणाऱ्या “मेस्मा” कायद्याची जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकड्डे यांच्या उपस्थितीत होळी करण्यात आली. सोबतच पेन्शन आढाव्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा जीआर व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सेवा खंडित करण्याची बजावलेल्या नोटीसच्या प्रतीचीही होळी करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी हे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. यावेळी जुनी पेन्शन योजना संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आशुतोष चौधरी हे विशेषत्वाने उपस्थित होते. विशेष म्हणजे काल आंदोलनस्थळी पाठ दाखविलेले जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुखांनी भोजन अवकाशात हजेरी लावून कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविले. सोबतच कर्मचाऱ्यासोबत नारे निदर्शने करण्यास सहभाग घेतला.
यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक रवींद्र काटोलकर यांनी कर्मचाऱ्यांचा मागण्यांना राजपत्रित अधिकारी महासंघाचा पाठिंबा असल्याची घोषणा केली. ज्या विभाग प्रमुखांनी आज आंदोलनस्थळी हजेरी लावली त्यामधे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) विपुल जाधव, कार्यकारी अभियंता(बांधकाम) सुभाष गणोरकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनोज गोस्वामी, वरिष्ठ लेखा अधिकारी मनोज मुन, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक रवींद्र कटोलकर, रोहिणी कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बालविकास) भागवत तांबे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. असीम इनामदार, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रेवती साबळे यांची उपस्थिती होती.
मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आज १७ मार्च रोजी देखील आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली. आजच्या आंदोलनात ज्यांनी नेतृत्व केले त्यामध्ये संजय सिंग, डॉ. सोहन चवरे,
अरविंद अंतूरकर, सुदाम पांगुळ, विजय बुरेवार, गोपीचंद कातुरे,अरविंद मदने, संजय तांबडे, सुजित अढाऊ, संतोष जगताप, भास्कर झोडे, किशोर भिवगडे, सुभाष पडोळे, जयंत दंढारे, योगेश राठोड, निरंजन पाटील, उमेश जायेभाये, योगेश हरडे, संगीता चंद्रिकापुरे, रंजना कांबळे, अलका खंते, हेमा सुरजुसे आदी कर्मचारी नेत्यांचा सहभाग होता.