द्वारसभेत सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
नागपूर – शरद नागदेवे
राज्य कर्मचारी संघटना व इतर कर्मचारी संघटनांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे व इतर सेवा विषयक मागण्यासाठी १४ मार्च पासून बेमुदत संप पुकारला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशीही जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा १०० टक्के प्रतिसाद मिळाला. आज सकाळी १० वाजता पासून “एकच मिशन जुनी पेन्शन” साठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करून जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडला. यात सर्व कर्मचारी संघटनांचा सहभाग होता.
तत्पूर्वी अंदोलनकर्त्यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.पूर्ण जिल्ह्यात संपाची परिस्थिती असल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा, पशुचिकित्सा, अध्यापन कार्य, सभा, बैठक, कार्यशाळा आदि कामावर परिणाम झाला आहे. मार्च महिना असूनही जिल्ह्यात ७६७ ग्राम पंचायतची तब्बल १० कोटीच्यावर तर ५ कोटीची पाणी पट्टी अशी १५ कोटी रुपयांची वसुली थांबली. आरोग्य कर्मचारी संपावर असल्यामुळे हजारो रुग्णांना त्याचा फटका बसला.
जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणात द्वारसभेत ६०० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच “एकच मिशन जुनी पेन्शन” चा नारा बुलंद केला व परिसर दणाणून सोडला. या वेळी महिला कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. जुनी पेन्शन योजना लागू करणे या एकमेव मागणीसाठी सर्व कर्मचारी आग्रही होते.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी वाढविले कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दुपारी आंदोलनस्थळी भेट देऊन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावले. काही विभाग प्रमुखांनी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून त्यांची सेवा खंडित का करण्यात येऊ नये ? अशी नोटीस बजावली. त्यावर कर्मचाऱ्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी आम्ही पदाधिकारी स्वस्थ बसणार नाही अशी यावेळी पदाधिकाऱ्यांनी हमी दिली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदाताई राऊत, महिला व बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, कृषि व पशुसंवर्धन सभापती प्रवीण जोध, शिक्षण व अर्थ समिती सभापती राजकुमार कुसुंबे, समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे, जिल्हा परिषद सदस्य संजय जगताप, प्रकाश खापरे, शंकर दडमल, माजी जिल्हा परिषद सदस्य उपासराव भुते आदी उपस्थित होते.
महासंघाच्या आदेशाची अधिकाऱ्यांनी केली अवहेलना
महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक सल्लागार ग.दि. कुलथे यांनी भोजन अवकाशात कर्मचारी करीत असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन नारे निदर्शने करण्यास सहभाग देण्याचे आदेश दिले होते. मात्र जिल्हा परिषद परिसरातील आंदोलनस्थळी एकही अधिकारी फिरकला नसल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांचा निषेध केला. अधिकारी अडचणीत असल्यास कर्मचारी धावून जाऊन मदत करतो, मात्र कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या मदतीची अपेक्षा असताना त्यांनी पाठ फिरविल्याचा निषेध व्यक्त केला.
तसेच सेवा खंडित करण्याची नोटीस देऊन धमकी देणाऱ्या विभाग प्रमुखाचाही निषेध केला.
संपातून माघार व कर्मचाऱ्यांत फूट पाडण्याचा भूमिका घेणाऱ्या प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधकाऱ्यांचा यावेळी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.आजच्या द्वारसभेत ज्यांनी नेतृत्व केले त्यामध्ये संजय सिंग, डॉ. सोहन चवरे, अरविंद अंतूरकर, सुदाम पांगुळ, विजय बुरेवार, गोपीचंद कातुरे,अरविंद मदने, संजय तांबडे,
सुजित अढाऊ, संतोष जगताप, भास्कर झोडे, किशोर भिवगडे, सुभाष पडोळे, जयंत दंढारे, योगेश राठोड, निरंजन पाटील, उमेश जायेभाये, योगेश हरडे, चिंधबा दाढे, संगीता चंद्रिकापुरे, रंजना कांबळे, अलका खंते आदी कर्मचारी नेत्यांचा सहभाग होता.