Friday, November 22, 2024
Homeराज्यमहिला उत्कर्षासाठी ‘महिला कट्टा’ दुवा ठरणार : विजयालक्ष्मी बिदरी...

महिला उत्कर्षासाठी ‘महिला कट्टा’ दुवा ठरणार : विजयालक्ष्मी बिदरी…

महिलांसाठी असलेल्या अभिनव व्यासपीठाचा शुभारंभ : विविध क्षेत्रातील महिलांचा सहभाग…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर : साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, विधी, उद्योग, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या महिलांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या महिलांना उत्तुंग भरारी घेता येईल. यासाठी निर्माण केलेला ‘महिला कट्टा’ ही संकल्पनाच आगळीवेगळी असून महिला उत्कर्षासाठी दुवा ठरणारी आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती प्रगती पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महिला कट्टा’ या विचारपीठाचा शुभारंभ सोहळा शनिवारी (ता, ११) सिव्हील लाईन स्थित प्रेस क्लब येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी म्हणाल्या, कुठलाही स्वार्थ न बाळगता केवळ महिला उत्कर्षासाठी अशी संकल्पना कुणीतरी मांडतं, हेच सुखावह आहे. या संकल्पनेचे प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक महिलेने स्वागत करायला हवे. आपल्याजवळ खूप काही आहे आणि कुणाजवळ तरी काहीच नाही. पण काहीतरी मिळविण्याची आसक्ती त्यांच्यामध्ये आहे. परंतु परिस्थिती त्यांना परवानगी देत नाही.

अशा महिलांना सहकार्याचा हात देत ज्या क्षेत्रात तिची जायची इच्छा आहे, भरारी घ्यायची इच्छा आहे, त्या क्षेत्रातील महिलांनी त्यांना सहकार्य केल्यास आणि गरजू महिलांनी अशा सहकार्यातून भरारी घेतल्यास ‘महिला कट्टा’च्या माध्यमातून इतिहास रचला जाईल. हा महिलांचा हक्काचा मंच आहे. त्यामुळे काहीतरी वेगळं करण्यासाठी या मंचात नक्कीच सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

‘महिला कट्टा’च्या संयोजिका प्रगती पाटील यांनी विचारपीठामागील संकल्पना विषद केली. तज्ज्ञ महिलांचे गरजू महिलांना मार्गदर्शन आणि सहकार्य मिळवून देण्याचे कार्य महिला कट्टा करेल. महिलांनी महिलांसाठी चालविलेले हे विचारपीठ असणार आहे. महिलांची सेवा, महिलांना पाठबळ आणि महिलांचा उत्कर्ष या त्रिसूत्रीवर ‘महिला कट्टा’चे कार्य चालेल. एकंदरच ही महिलांनी महिलांकरिता चालविलेली चळवळ म्हणून उदयास यावी. ‘महिला कट्टा’ या विचारपीठावर महिलांशी संबंधित विविध विषयांवर विचारमंथन होईल.

अनेक समस्यांवर चर्चा होईल. साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक असे विविध कट्टे या माध्यमातून तयार करण्यात येईल. या कट्ट्यात सहभागी झालेल्या महिलांना त्या-त्या क्षेत्राचा कृती कार्यक्रम तयार करायचा आहे. प्रथम चर्चा, नंतर मंथन, नंतर कृती कार्यक्रमाचे नियोजन आणि सरतेशेवटी त्याची अंमलबजावणी असे एकंदर या महिला कट्टाचे स्वरूप असेल, असे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दीपप्रज्वलन करून ‘महिला कट्टा’चा शुभारंभ केला. कार्यक्रम स्थळी साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, प्रशासन,विधी, गृहिणी, अभियंता असे विविध कट्टे तयार करण्यात आले होते. प्रत्येक क्षेत्रातील महिलांची कट्टानिहाय बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

विविध क्षेत्रातील महिलांनी यावेळी ‘महिला कट्टा’ या संकल्पनेसंदर्भात विचार व्यक्त केले. यात देवयानी जोशी (क्रीडा कट्टा), माया इवनाते (राजकीय कट्टा), डॉ. सुषमा देशमुख (वैद्यकीय कट्टा), आर.जे. निशा (माध्यम कट्टा), कल्पना वनकर (सामाजिक कट्टा), अभिलाषा शर्मा (अभियंता/वास्तुविशारद कट्टा), श्रीमती चौबे (साहित्यिक कट्टा), शेफाली भालेराव (समुपदेशक कट्टा), डॉ. संगीता राऊत (सांस्कृतिक कट्टा), रजनी ठाकरे( गृहिणी कट्टा),

डॉ. दीपा नंदनवार, वंदना शर्मा (उद्योग कट्टा), आभा मेघे (शैक्षणिक), डॉ. रंजना लाडे (प्रशासन कट्टा), आदींनी विचार मांडले. महिला कट्टा विचारपीठाच्या माध्यमातून महिलांनी मांडलेल्या सूचनांवर माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी भाष्य केले या अभिनव विचारपीठाचा उपयोग महिला उत्कर्षासाठी करण्याचा संकल्प उपस्थित महिलांनी केला.कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगांवकर, सना पंडित यांनी केले. आभार श्वेताली देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील महिलांची उपस्थिती होती.

विविध क्षेत्रातील या महिला होत्या उपस्थित
माजी महापौर अर्चना डेहनकर, माया इवनाते, नंदा जिचकार, माजी नगरसेविका आभार पांडे, संगीता गिर्हे, ज्येष्ठ साहित्यिक अर्चना सबाने, मनपा उपायुक्त डॉ . रंजना लाडे, पत्रकार वर्षा पाटील, राखी चव्हाण, अनुसया काळे, ममता जैस्वाल, डॉ. रोहिणी पाटील, स्वेताली देशमुख, सपना नायर, हरप्रित मुल्ला, अनिता मगरे, कल्पना फुलबांधे, शेफाली दूधबडे, डॉ. सुरेख जिचकार, डॉ. लिना निकम, जया देशमुख, साधना बरडे,

प्रेमलता तिवारी, सुचित्रा नशीने, प्रतिमा उईके, ज्योती रामटेके, राजलक्ष्मी दास, सुप्रिया सोनकुसळे, डॉ. सबिना शेख, अरुणा भोयर, सुनीता सोनी, नूतन रेवतकर, डॉ. संगीता राऊत, कल्पना मानकर, जया आंभोरे, संगीता बेहेरे, नंदा चौधरी, कल्याणी बुटी, शिवांगी गर्ग, ऍड. दैवशाला काळे, डॉ. उर्वशी याशरे, कीर्तिदा अजमेरा, आर. जे. निशा, सुचित्रा नशीने, भारती चरण यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: