आकोट – संजय आठवले
आकोट तालुक्यातील अडगाव खुर्द येथील दोघे सख्खे बंधू वासुदेव नत्थुजी इंगळे व लक्ष्मण नत्थुजी इंगळे यांचे दोन्ही घरास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीने ४० ते ४५क्विंटल कापूस जळून खाक झाला. त्यासह छपरासहित दोन्ही घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यामुळे घरातील कपडे अंथरूण, पांघरूम, कुलर, कपाट, त्यातील सोन्याचे दागिने तथा रोख पंधरा हजार रुपये यांची सुद्धा राख झाली.
होळीचे रात्री आपली नित्यकर्मे आवरून वासुदेव आणि लक्ष्मण इंगळे यांचे कुटुंबीय झोपी गेले. पहाटे चार वाजता त्यांना घरातील कापूस जळताना दिसला. त्याचे कारणाचा शोध घेतला असता घरातील विद्युत मीटरची वायर जळत असताना दिसली. मोठ्या प्रयासाने तिला खंडित केले गेले. यादरम्यान आगीचा मोठा डोंब उसळला. त्याने उग्ररूप धारण केले.
दोन्ही भाऊ व त्यांचे कुटुंबीयांनी कापूस वाचविण्याचा बराच प्रयास केला. हे प्रयास सुरू असतानाच आग विझविण्याचेही प्रयत्न सुरू होते. परंतु छपरासहित दोन्ही घरे, त्यातील सर्व समान मात्र जळून राख झाले. अडगाव खुर्द येथील तलाठी गोपाल वानरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यामध्ये चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान दर्शविण्यात आले आहे.