आकोट – संजय आठवले
उत्तुंग ध्येय आणि बुलंद हौसला यांचे बळावर आपल्या अपंगत्वावर मात करीत रशिया आणि दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध हिमशिखरे पादाक्रांत करणारा आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक धीरज कळसाईत हा आकोटपुत्र आता सायकल स्पर्धेत विश्वविक्रमाला गवसणी घालण्याकरिता काश्मीरमधील श्रीनगर येथून कन्याकुमारीकडे निघाला आहे. १ मार्चपासून त्याची ही स्पर्धा सुरू झालेली आहे.
आकोट शहरातील पोपटखेड मार्गानजीक श्रीराम नगर येथील बंडू कळसाईत यांच्या अत्यंत हलाखीच्या कुटुंबात असीम आत्मविश्वासू आणि अपार साहसी धीरजचा जन्म झाला. जन्मताच त्याच्या डाव्या हाताला मनगट नाही. तरीही साहसिक करामती करण्याची त्याला निसर्गतःच आवड होती. बालपणापासूनच त्याला व्यायामाचीही भारी हौस.जबर व्यायाम करून त्याने आपले शरीर कणखर आणि मजबूत बनविले. सोबतच विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले.
परंतु निसर्गाने त्याची परीक्षा घ्यायचा जणू चंगच बांधला आहे म्हणून की काय, एका अपघातात त्याचा एक पायही निकामी झाला. परंतु धीरज खचला नाही. थांबला नाही. निसर्गाला आव्हान देत तो नवनवीन साहसिक करामती करीतच राहिला.त्यातच त्याला गिर्यारोहणाबाबत आकर्षण वाटू लागले. कुटुंबाची हलाखीची स्थिती. आई, वडील, बहिण, भाऊ मजुरीवर गुजराण करतात. परंतु त्यांनीही धीरजला कधी दुखावले नाही.टोकले नाही. उलट त्याला नेहमी प्रोत्साहन दिले.
घरच्यांचे असे सहकार्य आणि उत्तुंग आत्मविश्वास यांचे बळावर अपंग धीरजने मग महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाईसह अनेक गड किल्ले सर केले. परंतु त्यावर त्याने समाधान मानले नाही. तो सरळ जगावर चालून गेला. आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक म्हणून तो आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला.
तेथून त्याने रशियातील माउंट अल्र्बूज व दक्षिण आफ्रिकेतील माउंट किली मंजारो या विश्वविख्यात हिमशिखरांवर यशस्वी चढाई केली. आणि तिथे मोठ्या डौलाने आणि अभिमानाने भारतीय राष्ट्रध्वज फडकविला. धीरजच्या या नेत्रदीपक विक्रमी यशाची दखल घेऊन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याच्या नावाची नोंद करण्यात आली. जगप्रसिद्ध हिमशिखरांवर कब्जा केल्यानंतर धीरजला पुन्हा काहीतरी वेगळे करावेसे वाटू लागले.
आणि त्याने सायकलिंग मध्ये विश्वविक्रम करण्याचा ध्यास घेतला. त्याकरिता त्याने आकोट येथील खडतर मार्गांवर दररोज ३०० किलोमीटर सायकलिंग करण्याचा सराव केला. हे श्रम करताना त्याला कोणताही दूध, काजू, बदामचा खुराक किंवा कोणत्या कंपनीच्या डब्यातील शक्तीवर्धक पावडर मिळाली नाही. आपल्या सर्वसामान्य घरात रांधलेले अन्न सेवन करूनच तो हा सराव करीत राहिला. त्यानंतर आता तो रेस अक्रॉस इंडिया या सायकल स्पर्धेत सहभागी झाला आहे.
या स्पर्धेत सहभागी होणारा धीरज हा पहिला अपंग भारतीय ठरणार आहे. काश्मीरमधील श्रीनगर येथून कन्याकुमारी पर्यंतचे तब्बल ३,६५१ किलोमीटर अंतराची ही स्पर्धा दि. १ मार्च रोजी सुरू झालेली आहे. तमाम आकोटकरांच्या मंगल कामना घेऊन धीरज या स्पर्धेत सहभागी झाला आहे. कमीत कमी वेळेत हे अंतर कापून गिनीज बुकात नाव नोंदविण्याचा त्याचा निग्रह आहे.
श्रीनगर येथील लाल चौकातून निघालेला धीरज अख्या भारतातील तब्बल 11 राज्ये व त्यातील 25 शहरे ओलांडून जाणार आहे. या प्रवासात त्याला बदलते प्रतिकूल हवामान, नैसर्गिक आपत्ती, खडतर रस्ते, अनोळखी भौगोलिक स्थिती यांचा सामना करावा लागणार आहे. आयोजकांतर्फे धीरजवर सॅटेलाईट व अन्य यंत्रणेद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. एक हात आणि एक पाय नसलेला धीरज हा या स्पर्धेतील एकमेव स्पर्धक आहे.
या सायकल स्पर्धेत त्याचे मदती करता टीम लीडर म्हणून राजीक अली व त्यांचेसह अर्चना गडधे, विशाल सुभेदार व प्रफुल्ल गिरी हे त्याचेसोबत आहेत. या स्पर्धेदरम्यान श्रीनगर ते कन्याकुमारी हे ३,६५१ किलोमीटरचे अंतर अवघ्या दहा दिवसात पूर्ण करण्याचा धीरजने संकल्प केला आहे चला, आपण आकोटकर आपल्या या सुपुत्राला त्याचा संकल्प पूर्ण करण्याची मंगल कामना अर्पण करू या. जेणेकरून धीरज स्वतःचे नावासह आकोटचे नावही आंतरराष्ट्रीय स्तरावर येऊ शकेल.