शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा रायपूर अधिवेशनात काँग्रेसचा संकल्प.
नक्षलवादी, दहशतवादी, आंदोलजीवी संबोधून भाजापाकडून शेतकऱ्यांचा अपमान.
रायपूर/मुंबई – केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपाची धोरणे शेतकरी विरोधी असून कृषी साहित्य, खते महाग झाली आहेत तर शेतमालाला हमी भाव मिळत नाही. शेती करणे परवडत नसल्याने शेतकरी आतमहत्या वाढल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे शेतीची अवस्था दयनीय झाली असून देशातील अन्नदात्याला उद्ध्वस्त केले जात आहे. परंतु काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल, असा संकल्प या महाअधिवेशनात करण्यात आल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
रायपूर येथील काँग्रेस महाअधिवेशनात सांगता समारोहाच्या दिवशी मांडण्यात आलेल्या कृषी प्रस्तावावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष किसानमुक्त भारत बनवण्याचे प्रयत्न करत आहे. अन्नदात्याला देशोधडीला लावून शेती व शेतकरी संपवण्यासाठीच केंद्रातील भाजपा सरकारने तीन काळे कृषी कायदे आणले होते. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीच्या सीमेवर वर्षभर शेतकरी आंदोलन झाले.
या आंदोलनात ७०० शेतकरी शहिद झाले पण पंतप्रधान दिल्लीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांशी बोलण्यास गेले नाहीत. शेतकऱ्यांना दहशतवादी, नक्षलवादी, आंदोलजीवी संबोधून अपमान करण्यात आला. पंतप्रधानांनीही संसदेत बोलताना शेतकऱ्यांना आंदोलजीवी म्हणून अपमान केला.
खासदार राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ३५०० किलोमीटरची पदयात्रा काढली. या पदयात्रेत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, व्यथा व वेदना जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे प्रस्ताव या अधिवेशनात मांडण्यात आले आहेत.
भाजपा सरकारच्या काळात शेतकरी व शेतीकडे दुर्लक्ष केल्याने शेती करणे परवडत नाही. वीजेचे दर वाढवले जात आहेत तर शेतीला आवश्यक असणारी वीजही मिळत नाही. भाजपा राजवटीत शेती करणे महाग झाले आहे. शेतकऱ्याचा योग्य सन्मान झाला पाहिजे, त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे याचा विचार करुन काँग्रेस पक्षाने काही योजना आखल्या आहेत, त्या देशभर पोहचवण्याचे काम केले जाईल, असेही पटोले म्हणाले.