सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटी कोंडावार यांचा आरोप
गडचिरोली – भामरागड वनविभागांतर्गत येत असलेल्या येचली नदी घाटातील अवैध रेती उत्खनन व वाहतूक प्रकरण चांगलेच गाजले असतांनाही या वनक्षेत्रात नियमाला तिलांजली देत गौण खनिजाचे सर्रास उत्खननाचे प्रकार सुरुच आहे. असाच प्रकार एटापल्ली व ताडगाव वनपरिक्षेत्रात दिसून येत आहे. एकीकडे संबंधित कंत्राटदार गौण खनिजाचे अवैध उत्खनन करुन मस्त झाले असतांना त्यांचेवर कारवाई होत नसल्याने वनविभाग सुस्त का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यपालांनी दत्तक घेतलेले जिल्ह्यातील एकमेव तालुका म्हणून भामरागडची ओळख आहे. असे असले तरी या भागाचा पाहिजे त्या प्रमाणात अद्याप विकास झालेला नाही. अशातच काही विकासात्मक कामे होत असली तरी यातही मोठ्या प्रमाणात गैरकारभाराची भर पडत आहे. नुकताच याच तालुक्यातील येचली गावातील रेती प्रकरण चांगलेच गाजले. या प्रकरणामुळे महसूल विभागात चांगलीच खळबळ माजली होती.
या प्रकरणी कंत्राटदारावर कोट्यवधीची दंडात्मक कारवाईही झाली होती. असे असले तरी तालुक्यात गौण खनिजाची अवैध लूट सुरुच आहे. भामरागड वनविभागांतर्गत येत असलेल्या एटापल्ली व ताडगाव वनक्षेत्रात अवैध मुरुम उत्खनन सुरु आहे.
याकरिता सर्रास वृक्षांची कत्तलही केली जात आहे. संबंधित कंत्राटदारांद्वारे राजरोसपणे याकरिता वृक्षांची कत्तल केली जात असतांना वनविभागाद्वारे कोणतीही कारवाई होत नसल्याने या कंत्राटदारांची मुजोरी वाढत चालली परिणामी वनसंपत्तीची प्रचंड हानी झाली असून शासनाचा कोट्यावधीचा महसूलही बुडत आहे.
सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार वनसंपत्तीच्या या अमिप हानीपोटी संबंधित वनाधिकारी तसेच महसूल विभागाकडे अनेकदा तक्रार, निवेदने दिली. मागील एक वर्षापासून गौण खनिज चोरीसंदर्भात त्यांचा वरिष्ठ स्तरावर त्यांचा पाठपुरावा सुरु आहे. विशेष म्हणजे महामहिम राज्यपालांनी दत्तक घेतलेला हा तालुका असल्याने सर्वच अधिका-यांचे बारकाईने लक्ष लागले असते. मात्र संबंधित विभागाच्या वतीने यावर ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने अवैध गौण खनिज तस्करांचे चांगलेच फावत आहे.
त्यामुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी भामरागड वनविभागातील संबंधित क्षेत्रातील अवैध गौण खनिज उत्खननाची सखोल चौकशी करुन यात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ताटीकोंडावार यांनी केली आहे.
राज्यपाल महोदयांनी भामरागड तालुका दत्तक घेतल्याने सर्वच अधिका-यांचे याकडे लक्ष लागलेले असते. त्यामुळे तालुक्यात विकास कामांना अधिक भर देणे आवश्यक आहे. असे असतांना तालुक्यातील गौण खनिजाची सर्रास लुट होत आहे. यासंदर्भात मागील एक वर्षापासून सातत्याने तक्रार, निवेदनातून सदर प्रकरण वरिष्ठ स्तरावर मांडले.
मात्र अद्यापही ठोस अशी कारवाई करण्यात आली नाही. या तक्रारीमुळे संबंधिताकडून माझ्यावर दबावतंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन भ्रष्ट अधिका-यांसह कंत्राटदारावर कारवाई करावी.
संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते