गणेश तळेकर
महाराष्ट्राच्या अस्सल लाल मातीतील भूमिका साकारत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता भाऊसाहेब शिंदे पुन्हा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्यानंतर ‘बबन’मध्ये डॅशिंग भाऊसाहेबचं दर्शन घडलं होतं. आता ‘रौंदळ’ या आगामी मराठी व हिंदी चित्रपटात भाऊसाहेबचा रांगडा लुक बघायला मिळणार आहे. ३ मार्च २०२३ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं प्रोडक्शन हाऊसच्या वतीनं घोषित करण्यात आलं आहे.
भूमिका फिल्म्स अॅण्ड एंटरटेनमेंटच्या निर्मिती संस्थेअंतर्गत बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी, भाऊ शिंदे आणि राईज बिझनेस ग्रुप यांनी ‘रौंदळ’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवींद्र आवटी, संतोष आवटी, कैलाश गुंजाळ आणि संजय कुंजीर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन गजानन नाना पडोळ यांनी केलं आहे. या ३ मार्च २०२३ ही ‘रौंदळ’च्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषित करण्यात आली आहे.
पहिल्या पोस्टरपासूनच हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. पहिल्या पोस्टरमधील भाऊसाहेबचा लुक त्याच्या चाहत्यांना भलताच भावला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित झाल्यानंतर हळूहळू या चित्रपटातील इतर बाबी समजणार आहेत. या चित्रपटात भाऊच्या जोडीला नेहा सोनावणे आहे. या चित्रपटातील ‘मन बहरलं…’ हे प्रेमळ गीत काही दिवसांपूर्वीच रसिकांच्या भेटीला आलं असून, या गाण्याला संगीतप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.
‘रौंदळ’बाबत दिग्दर्शक गजानन पडोळ म्हणाले की, आजवर ग्रामीण बाजाचे बरेच चित्रपट रिलीज झाले असले तरी या चित्रपटाचा बाज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध दूरवर पसरवणारा असल्याची जाणीव रसिकांना होईल. सत्य घटनेवर आधारलेल्या या कथेत गावातील वास्तव घटनांसह इतरही बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत.
‘रौंदळ’च्या माध्यमातून रसिकांसमोर एक म्युझिकल सिनेमा सादर करण्याचा आमच्या संपूर्ण टिमचा प्रयत्न आहे. भाऊसाहेब शिंदेनं साकारलेला नायक आजवर मराठी चित्रपटांमध्ये पाहिलेल्या नायकापेक्षा खूप वेगळा असल्याचं चित्रपट पाहताना प्रेक्षकांना जाणवेल. चित्रपटगृहातून बाहेर पडताना हा चित्रपट प्रेक्षकांना बरंच काही देऊन जाईल असंही पडोळ म्हणाले.
या चित्रपटात यशराज डिंबाळे, सुरेखा डिंबाळे, शिवराज वाळवेकर, संजय लाकडे, गणेश देशमुख, सागर लोखंडे आदी कलाकार आहेत. सुधाकर शर्मा, डॅा. विनायक पवार, बाळासाहेब शिंदे यांनी लिहिलेल्या गीतरचना वैशाली माडे, सोनू निगम, जावेद अली, गणेश चंदनशिवे, स्वरूप खान, दिव्या कुमार, हर्षित अभिराज यांनी गायल्या आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेता साऊंड डिझायनर महावीर साबन्नावरनं या चित्रपटाचं सिंक साऊंड आणि डिझाईन केलं आहे.
डिओपी अनिकेत खंडागळे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, फैझल महाडीक यांनी एडिटींग केलं आहे. विक्रमसेन चव्हाण या सिनेमाचे असोसिएट दिग्दर्शक आहेत. रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत दिलं असून, नेहा मिरजकर यांनी कोरिओग्राफी केली आहे.
समीर कदम यांनी मेकअप, सिद्धी योगेश गोहिल यांनी कॅास्च्युम, मोझेस फर्नांडीस यांनी फाईट सीन्स, गजानन सोनटक्के यांनी कला दिग्दर्शनचे काम पाहिलं आहे. मंगेश भिमराज जोंधळे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी चोख बजावली असून डीआय वॅाट स्टुडिओमध्ये, डीआय कलरीस्ट श्रीनिवास राव यांनी, व्हिएफएक्स सुपरवायजिंग सतिश येले यांनी, आॅनलाईन एडीटींग माही फिल्म्स लॅबचे विक्रम आर. संकपाळे यांनी केले आहे.