आकोट – संजय आठवले
महाशिवरात्री आणि शिवजन्मोत्सवाचे पर्वावर पोलीस बंदोबस्तात गुंतल्याने चार दिवसाचा आराम घेतल्यावर उद्यापासून अतिक्रमण हटाव मोहीम नव्या दमाने प्रारंभ होणार असून अन्य व्याप कमी झाल्याने या मोहिमेकरता पर्याप्त पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे.
अतिक्रमण मोहिमेच्या या ब्रेक दरम्यान आकोट बस स्थानकासमोरील जुन्या लक्कडगंज दुकानदारांनी आपले अतिक्रमण न काढणे बाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.आकोट शहरात महाशिवरात्री आणि शिवजन्मोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. यावर्षी हे दोन्ही उत्सव लागोपाठ आल्याने पोलीस विभाग त्या बंदोबस्तात व्यस्त झाला होता. त्यामुळे शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेनेही चार दिवसांचा विश्राम घेतला.
उद्या दिनांक २१ फेब्रुवारीपासून पोलीस बंदोबस्तासह ही मोहीम पुन्हा कार्यप्रवण होणार आहे. यावेळी आवश्यक असलेल्या अतिक्रमणासह लोकांनी मागणी केलेल्या ठिकाणावरील अतिक्रमणही काढण्याचा मनसुबा आहे. त्याकरिता पालिकेने पूर्ण तयारी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हा टप्पा महत्त्वाचा असून या टप्प्यात बऱ्याच किचकट बाबींना तोंड द्यावे लागणार आहे. या टप्प्यात राजकीय हस्तक्षेपही होणार असल्याची कूणकूण कानावर येत आहे. त्यामुळे या टप्प्यात अतिक्रमण हटाव मोहिमेची खरी कसोटी लागणार असल्याचे दिसते.
त्याकरिता हा टप्पा अतिशय निरपेक्षपणे पार पाडणे गरजेचे आहे. याचे कारण म्हणजे या टप्प्यात अशी अतिक्रमणे येणार आहेत ज्यावर नागरिकांचा रोख आहे. दरवेळी रस्त्यांच्या कडेच्या टपऱ्या उध्वस्त होत आल्या आहेत. मात्र काही बड्या अतिक्रमणांची निरर्थक कागदपत्रे दाखविण्यात येतात. त्यायोगे अधिकारीही सखोल चौकशी न करता आगेकूच करतात. त्यामुळे दरवेळी ज्या गरीब टपरीधारकांचे अतिक्रमण काढण्यात आले आहे त्या गरिबांचे शिव्याशाप अधिकाऱ्यांना झेलावे लागतात. यावेळी तसे होऊ नये आणि सर्वांना समान न्याय मिळावा अशी नागरिकांची मागणी आहे.
अशा स्थितीत आकोट बस स्थानकासमोरील जुन्या लक्कडगंज दुकानदारांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात आपले अतिक्रमण न हटविण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्या पुष्ट्यर्थ त्यांनी पालिकेने दिनांक ३१.३.१९८४ रोजी घेतलेल्या ठरावाचा हवाला दिला आहे. या दिवशी पालिका स्थायी सभेने ही जागा लाकूड बाजाराकरिता देण्याचा ठराव क्रमांक ९ पारित केलेला आहे. त्यानुसार या ठिकाणी १५×४० अर्थात ६०० चौरस फूट जागा १५ लोकांना वितरित केली गेली.
त्या पोटी दर १०० फुटास १० रुपये वार्षिक भाडे मूक्रर केले गेले. या ठरावाचे सुचक तत्कालीन नगरसेवक उत्तम बेराड असून अनुमोदक तत्कालीन नगरसेवक अब्दुल सत्तार शेख अमीर हे आहेत. पालिकेच्या ठरावान्वये आपण या ठिकाणी लाकूड व्यापार करीत असल्याने आपल्याला अतिक्रमण हटाव मोहिमेतून वगळण्याचा दावा या लोकांनी केला आहे. विधीज्ञ महंमद जहिरोद्दीन यांनी लक्कडगंज दुकानदारांची बाजू मांडली.
मात्र असे असले तरी आपण हे अतिक्रमण काढणार असल्याचे पालिका मुख्याधिकारी यांनी या शिष्टमंडळाला सांगितले. ही जागा अतिशय मोक्याची असल्याने या जागेवर मोठे व्यापारी संकुल उभारावयाचा पालिकेचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हे प्रकरण एका बड्या राजकीय नेत्याकडे गेले आहे. या राजकीय नेत्याचे आमदार भारसाकळे यांच्याशी बरेच मधूर संबंध आहेत. मात्र अद्याप या संबंधांचा काही उपयोग घेतल्याची वार्ता कानी नाही. परंतु या नेत्याने काही हालचाली करून या लोकांच्या चालू भाडे पावत्या प्राप्त करण्याचा प्रयास सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मात्र या प्रक्रियेत तुंबलेल्या भाड्याची अडचण निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या १५ जणातील प्रत्येकाकडे ७०-८० हजाराचे वर भाडे तुंबलेले आहे. या संदर्भात पालिका कर विभागाकडे माहिती घेतली असता अद्यापपर्यंत अशा भाडे पावत्या देणे बाबत किंवा तुंबलेले भाडे वसुली बाबत कुणाशीही काहीही चर्चा झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे या दुसऱ्या टप्प्यात पुढे असे अनेक प्रसंग येणार असल्याचे दिसते. त्यावर पालिका काय भूमिका घेते हे पाहणे गरजेचे आहे.