नरखेड – अतुल दंढारे
जीवनात यशस्वी होण्याकरिता माणसे जोडण्याची कला आत्मसात करणे आवश्यक आहे.’माणसे ओळखा, माणसे पारखा, माणसे जोडा व माणसे राखा’ हा मुलमंत्र शिवरायांनी आपल्या वर्तनातून दिलेला आहे.म्हणून ‘जात,पात,धर्म,पंथ’ यात भेदभाव न करता जीवाला जीव देणारी मावळ्यांची फौज शिवरायांनी तयार केली. विश्वासू माणसांच्या बळावर ‘विश्ववंदिता’ ठरणारे स्वराज्य निर्माण झाले.यासाठी शिवरायांनी आजच्या व्यवस्थापन शास्त्रातील काही कौशल्य १६ व्या शतकातच आत्मसात केलेली होती.याच कौशल्यामुळे माणसे जोडून स्वराज्य निर्माण केले.
१) संवाद कौशल्य
जगातील माणसे,मित्र,सहकारी, अनुयायी आणि शत्रूदेखील बनतो ते केवळ संवाद कौशल्यामुळे.कठोर बत्तीस दातांच्या मध्ये जीभ असते, मात्र ती आपले अस्तित्व कधीही नष्ट होऊ देत नाही.दात कडक असले तरी जीभ नरमच असते.ज्यांची जीभ मधुर, गोड बोलते ती माणसे जिंकतात.शिवरायांचे पहिले गुरू राजमाता जिजाऊ हे चालते बोलते ज्ञानाचे,
कौशल्याचे,त्यागाचे,समर्पणाचे विद्यापीठ होते.मा जिजाऊंच्या तालमीत शिवराय बालपणापासूनच संवाद कौशल्य आत्मसात केले होते.महाराजांच्या आयुष्यातील पहिली लढाई करण्यापूर्वी मावळ्यांना उद्देशून पुरंदर किल्ल्यावर प्रेरणादायी भाषण केले होते.या भाषणातून ऊर्जा घेऊन मावळे जिंकले.
संवादामुळेच शिवरायांनी अफजलखानला वाईवरून प्रतापगडाच्या पायथ्यापाशी आणण्याकरिता बाध्य केले.सिद्दी जौहरला तहाच्या बोलणीत गाफील ठेवून मिर्झाराजे जयसिंगरावला आपलेसे करून घेतले.केवळ शाब्दिक कौशल्यामुळे शिवरायांनी शत्रुलाही मित्र केल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहे.
२) मदत कौशल्य
जो इतरांना मदत करतो तोच मोठा होतो , मात्र मदत कशी करावी याचेही एक कौशल्य आहे.क्षणिक समस्या सोडविण्यासाठी मदत न करता , समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे काधीही चांगले असते.तात्पुरती मदत करून श्रेय न लाटता कायमस्वरूपी मदत करून आयुष्याची दशा व दिशा बदलविणे आवश्यक आहे. शिवराय वयाच्या बाराव्या वर्षी पुण्यात आले.तेव्हा सगळीकडे दुष्काळ होता.एखादा राजकारणी असता तर त्यांनी धान्यवाटप व पाणीपुरवठा करून प्रश्न सोडविला असता, मात्र शिवराय राष्ट्रनिर्माते होते.
त्यांनी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शाश्वत मदतीची भूमिका ठेवली.लोकांना कसायला जमीन दिली.ती जमीन त्यांच्या मुलांच्या कामी यावी म्हणून त्यांच्या नावावर करून दिली.शेतीला पाणी तर लागणारच म्हणून शिवगंगा नदीवर बंधारे बांधले, विहिरी खोदल्या, तलाव बनविली. मग पेरण्यासाठी बियाणे व खाण्याकरिता धान्य दिली.अश्या शाश्वत मदत करून महाराष्ट्राला सुजलाम व सुफलाम केले.
३) नेतृत्व कौशल्य
नेतृत्व म्हणजे ध्येय निश्चित करून ते पादाक्रांत करीत नाही तोपर्यंत भविष्याचा वेध घेणं. केवळ मिळविण्यासाठी नव्हे तर इतरांच्या जिवनात सुख,आनंद व स्वतःच्या चेहऱ्यावर ‘समाधान’ येतपर्यत अहोरात्र पुढाकार घेणे होय. शिवरायांनी नेतृत्व कौशल्यामुळेच ४०० वर्षाच्या गुलामगिरीवर मात करीत केवळ ३५ वर्षात स्वराज्य निर्माण केलं.नेतृत्व म्हणजे जोखीम.परंतु कोणती जोखीम घ्यावी, कधी घ्यावी,कशी घ्यावी व का घ्यावी ?
या प्रश्नाचे उत्तरे ज्याला कळते तोच यशस्वी होतो.शिवरायांनी बहादुरगड सारखा किल्ला युद्ध न करता जिंकला.आणि विना रक्तपात होता शत्रूला नमविले. यशाचे श्रेय सहकाऱ्यांना देणं व पराभव झालाच तर स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारणं हे खऱ्या योध्याचे लक्षण आहे.शिवरायांनी नेतृत्व करतांना स्वराज्य मोठं करतांना सोबतच्या मावळ्यांना मानसन्मान व आर्थिक दृष्टीने संपन्न केले.
४.संयमाचे कौशल्य
आयुष्यात यश आणि अपयश यात अस्पष्ट अशी सीमारेषा असते, ती म्हणजे ‘संयम’ होय.ज्यांना ही रेषा ओळखता आली तो यशाचा उत्सव साजरा करू शकतो व अपयशाचे दुःखही पचवू शकतो.शिवचरित्रातून हीच गोष्ट शिकायला मिळते.अफजलखान मोठे सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला.अनेकांना पत्रव्यवहार केला , कुठे धमकी तर कुठे नम्रता दाखविले.फक्त चार महिने संयम ठेवला पावसाळा संपताच शत्रूला आपल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवून खानाला संपविले.
सिद्धी जौहरने पन्हाळाला वेढा दिला.काही वेळ संयम ठेवला.जुलै महिन्यात पावसाळा वाढल्याची संधी बघताच पन्हाळा सोडून विशालगड गाठले.शाहिस्तेखान लालमहालात शिरून तीन वर्ष थांबला. संयम ठेवीत एका रात्री महालात घुसून शायिस्तखानाची बोटे कापली व सळो की पळो करून सोडला.संयमाचे कौशल्य तर खऱ्या अर्थाने पणाला लागते जेव्हा लोक तुमची विनाकारण बदनामी करतात आणि तुम्हाला संयम सोडायला भाग पाडण्याचे षडयंत्र रचित करतात.
५.सत्याचे कौशल्य
आपले विचार,बोलणे व कृती जेव्हा एकाच दिशेची असते तेव्हा आपण ‘सत्याचे कौशल्य’ आत्मसात केले, असे समजण्यास हरकत नाही.आपल्या बोलण्यातील व वागण्यातील सत्यता सवंगडयाना पटवून देण्याकरिता महाराजांनी स्वराज्याची रायेरश्वराच्या मंदिरात शपथ घेतांना बलिदानाची,त्यागाची सुरुवात स्वतःपासून करतांना स्वतःची करंगळी कापून रक्ताचा अभिषेक केला.
शिवरायांनी स्वतः बांधलेल्या किंवा जिंकलेल्या एकाही किल्याला स्वतःचे, कुटूंबियांचे किंवा परिवाराचे नावे दिली नाही , तर सर्व किल्ले,जमीन व संपत्ती स्वराज्याच्या नावे केली.
जात,पात,धर्म ,पंथ यात भेदभाव न करता जो स्वराज्यासाठी पराक्रम गाजवेल त्यांना बक्षीस दिले व सर्वांना रोखीत वेतनदारी पध्द्त सुरू केली.
जो रयतेवर अन्याय करेल त्याला शिक्षा होईलच याची सत्यता पटवून देण्यासाठी बलात्कार प्रकरणात रांझे गावाचा पाटील बाबाजी गुजर यांची दोन्ही पाय व दोन्ही हात कापून काढली.स्वराज्याशी गद्दारी केली म्हणून सख्या मेहुणा सखोजी गायकवाड यांची दोन्ही डोळे काढली.
अष्टप्रधान मंडळ निर्माण करतांना एकही मित्र किंवा नातेवाईक यांची निवड न करता कुवत व क्षमता पारखून सामान्य व्यक्तींचा समावेश करण्यात आला.अशा अनेक कृतीतून स्वकीयांना सोबतच शत्रूंनाही शिवरायांची सत्यता पटवून आली. म्हणूनच स्वराज्यात सर्वसामान्य रयत जोडली गेली.
अशाप्रकारे शिवरायांनी आजच्या व्यवस्थापन शास्त्राचे तंत्रे १६ व्या शतकात वापरून शून्यातून स्वराज्य निर्माण केले.शिवरायांची ‘दुर्दम्य ईच्छाशक्ती व माणसे जोडण्याची कला’ यामुळे सर्वसामान्य रयत जोडत गेली.व शून्यातून स्वराज्य निर्माण झाले.आज आपण शिवरायांच्या या प्रेरणादायी कार्यापासून प्रेरणा घेऊन ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्राचे ‘सुराज्य’ निर्माण करूया.