महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांचे निर्देश
महावितरणकडून गेल्या दहा महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या १ लाख ४ हजार ७०९ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५४ हजार वीजजोडण्या केवळ गेल्या तीन महिन्यांमध्ये दिल्या आहेत. हा वेग आणखी वाढवून येत्या मार्चपर्यंत जास्तीत जास्त कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील कृषिपंपाच्या प्रलंबित वीजजोडण्या ताबडतोब देण्यात याव्यात असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी आज नियोजन भवनात झालेल्या बैठकित दिले.
विविध योजनांमधून क्षेत्रीय कार्यालयांना निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्यात कोणतीही अडचण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या संदर्भात संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी अमरावती परिमंडलाचा आढावा घेतला. यावेळी नागपूर प्रादेशिक संचालक श्री. सुहास रंगारी, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. ज्ञानेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
संचालक श्री. ताकसांडे म्हणाले की, गेल्या मार्च २०२२ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना नवीन वीजजोडण्या येत्या मार्च महिन्यापर्यंत देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार महावितरणने या सर्व वीजजोडण्या देण्यासाठी विविध योजनांचा समावेश असलेला कृती आराखडा तयार केला आहे व शासनाने दिलेले उदिद्ष्ट निर्धाराने गाठण्यासाठी युद्धपातळीवर कामे देखील सुरु केली आहेत.
अमरावती व यवतमाळ जिल्ह्यामध्ये मार्च २०२२ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपाना ३१ मार्चपर्यंत वीज जोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी महावितरणचे अधिकारी व संबंधित कंत्राटदार यांनी कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्यांच्या कामांना अधिक वेग द्यावा. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय सहन केली जाणार नाही असे संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी स्पष्ट केले.
येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत यवतमाळ जिल्ह्यात १७०० तर अमरावती जिल्ह्यामध्ये १६५० कृषिपंपाच्या पैसे भरून प्रलंबित असलेल्या नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.परंतु ज्या उपविभागात कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या देण्याचा वेग कमी दिसून आला तेथील अधिकाऱ्यांना श्री. ताकसांडे यांनी बैठकीत धारेवर धरले. कृषिपंपाच्या प्रलंबित वीजजोडण्या ताबडतोब देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय व कंत्राटदार एजंसीच्या कामावर मुख्यालयाकडून दैनंदिन लक्ष ठेवण्यात येत आहे असे संचालक श्री. ताकसांडे यांनी स्पष्ट केले.
फोटो ओळ- अमरावती येथील ‘नियोजन भवन’मध्ये महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्यांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी प्रादेशिक संचालक श्री. सुहास रंगारी उपस्थित होते.