आकोट – संजय आठवले
अकोला ते आकोट स्थानकापर्यंत येऊन थांबलेल्या रेल्वे रुंदीकरणाचे कामाकरिता लागणाऱ्या जमिनीचे संपादन करण्याकरिता संयुक्त मोजणीची कार्यवाही सुरू करणे संदर्भात भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकोट यांनी रेल्वे प्रशासनास कळविले असून अल्पावधीतच ही कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
अकोला आकोट खंडवा या मीटर गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करण्याचे काम आकोट रेल्वे स्थानकापर्यंत बेरोकटोकपणे पार पडले आहे. आकोट रेल्वे स्थानकही बांधून सज्ज झाले आहे. परंतु आकोट रेल्वे स्थानकासमोरच्या मार्गाकरिता भूसंपादन न झाल्याने हे काम थंड बस्त्यात पडले होते. हा मार्ग अडगाव पासून पुढे कोणत्या दिशेने न्यावा याबाबतीत अनेक अडचणी निर्माण झाल्याने ह्या भूसंपादनाचे कामात बाधा निर्माण झाली होती. आताही हा प्रश्न सुटलेला नाही. मात्र त्या संदर्भात उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत.
त्या अनुषंगाने दि. ७.२.२०२३ रोजीच्या उच्चस्तरीय बैठकीत या विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. अल्पावधीतच या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. ही कार्यवाही सुरू असतानाच आकोट रेल्वे स्थानकापासून अडगाव बुद्रुक पर्यंतच्या मार्गाकरिता भूसंपादन करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. त्याकरिता रेल्वे दुरुस्ती कायदा २००८ मधील तरतुदीनुसार कलम २० ए ची अधिसूचना कार्यान्वित करण्यात आली आहे.
त्यानुसार संयुक्त मोजणीची कार्यवाही सुरू करणे बाबत भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विश्वनाथ घुगे यांनी रेल्वे प्रशासनास कळविले आहे. या मार्गाच्या आधीच झालेल्या सर्वेमध्ये जमीन लागणाऱ्या गावांच्या शेतशिवाराची संयुक्त मोजणी करण्यात येणार आहे. ही मोजणी त्या त्या क्षेत्रातील मंडळ अधिकारी, तलाठी, भूमी अभिलेख कर्मचारी तथा रेल्वे अभियंता या संयुक्त पथकाकडून केली जाणार आहे.
या मार्गाकरिता केमलापूर, जोगबन, ग्यासुउद्दीन नगर, अडगाव खुर्द, कातखेड, वडाळी सटवाई, अडगाव बुद्रुक व शिवाजीनगर या गावाच्या रेल्वे मार्गालगतच्या शिवाराची मोजणी करण्यात येणार आहे. या मोजणी नंतर कोणत्या कास्तकाराचे किती भूक्षेत्र संपादित करावयाचे आहे ते निश्चित होणार आहे. त्या मोजणीकरिता संबंधित शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येणार आहे. ह्या साऱ्या कवायती नंतर जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचा मुआवजा निश्चित होणार आहे.
या मोजणी कार्यवाहीत आधी समाविष्ट असलेले सदरपुर हे गाव वगळण्यात आले आहे. अडगाव बुद्रुक च्या पुढील कार्यवाहीकरिता अद्याप कोणताच निर्णय न झाल्याने तूर्तास ही कार्यवाही आकोट रेल्वे स्थानक ते अडगाव बुद्रुकपर्यंत केली जाणार आहे. त्या पुढील मार्गाबाबत या कार्यवाही दरम्यान तोडगा निघण्याची शक्यता असल्याने हा टप्पा पार पडताच ती पुढील कार्यवाही प्रारंभ केली जाईल. अशी माहिती भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विश्वनाथ घुगे यांनी दिली.