मुंबई नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाची यादी येऊन महिना होवून गेला तरीही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेच जमा झालेले नाहीत. आज- उद्या पैसे जमा होतील, या आशेने बँकेत हेलपाटे मारणारा शेतकरी आता थकला आहे.
दरम्यान, याबाबत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची भेट घेतली फेब्रुवारी अखेर वित्त विभागाच्या मान्यतेनंतर मार्च अखेर हे अनुदान शेतक-यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्य शासनाकडे प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी लावून धरली. त्यातून शासनाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ५० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली.शासनाच्या घोषणेनंतरही तब्बल एक महिन्यांनी पहिली यादी आली. या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर जाऊन आधार प्रमाणिकरण केले,
त्याचा संदेशही संबंधितांच्या मोबाईलवर आला, पण प्रत्यक्ष रक्कमच अजून खात्यावर जमा झालेली नाही. शासनाच्या नियमानुसार ज्यादिवशी आधार प्रमाणिकरण होईल त्याच दिवशी ही रक्कम जमा होणार होती. म्हणून शेतकरी बँकेत हेलपाटे मारत आहेत, पण शासनाकडून निधीच न आल्याने ही रक्कम जमा न झाल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे.
याबाबत आज मुख्य सचिवांनी राज्याचे सहकार सचिव व वित्त सचिव यांना ज्या शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे.
अशा दुसऱ्या यादीतील शेतकऱ्याचे अनुदान येत्या आठवड्याभरात जमा करण्याच्या सुचना देवून सदरचे अनुदान तातडीने वितरित करण्याबाबत आदेश दिले. सध्या तिस-या यादीतील अनुदानाची फाईल वित्त विभागाकडे असून फेब्रुवारी अखेर ही मान्यतेची प्रक्रिया पुर्ण करून पुरवणी मागणीतून मार्च अखेर पर्यंत सर्व अनुदानाची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे सांगितले. यामुळे शेतक-यांना अजून दोन महिनाभर तरी वाट पहावे लागणार आहे.