Thursday, October 24, 2024
Homeमनोरंजननटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृती सुगंध मान्यवरांनी दिला गोपीनाथ...

नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृती सुगंध मान्यवरांनी दिला गोपीनाथ सावकार यांच्या आठवणींना उजाळा…

गणेश तळेकर

नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या ५०व्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ सावकार स्मृति विश्वस्तनिधीच्या वतीने गोपीनाथ सावकार स्मृतिसुगंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या ५०व्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांनी त्यांच्या कलामंदिर संस्थेतर्फे सादर केलेल्या गाजलेल्या मराठी संगीत नाटकातील नाट्य गीतांचा नजराणा असणारा स्मृती सुगंध हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ४.०० वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील मिनी थिएटरमध्ये संपन्न झाला.

चार दशकांहून अधिक काळ रंगभूमीची सेवा करणाऱ्या सावकार यांच्या स्मृती जागवणाऱ्या या कार्यक्रमाची संकल्पना सुभाष सराफ यांची असून या कार्यक्रमास रमाकांत खलप ( माजी कायदामंत्री, केंद्र सरकार), अनिल खवंटे ( प्रसिद्ध उद्योगपती, गोवा ) आणि अभिनय सम्राट मा.अशोक सराफ यांची विशेष उपस्थिती होती.

गायक श्रीरंग भावे, नूपुर गाडगीळ, श्रीया सोंडूर बुवा यांनी आपल्या गायनाने स्मृती सुगंध मध्ये सुमधुर रंग भरले. त्यांना तबल्यावर साई बँकर आणि हार्मोनियमवर निरंजन लेले यांनी साथ दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद सराफ, आणि प्रतिभा सराफ यांनी केले. कार्यक्रमास तांत्रिक सहाय्य विश्वास महाशब्दे ,प्रसिद्धी समन्वयक शीतल करदेकर, आणि सुत्रधार रविंद्र ढवळे होते.

यावेळी अशोक सराफ व रमाकांत खलप यांचा त्यांच्या अमृत महोत्सव वर्ष निमित्त सत्कार करण्यात आला. रमाकांत खलप म्हणाले की, ही सराफांची पेढी असून, यात जड-जवाहिर आणि हिरे-माणिकांशिवाय आणखी काय मिळणार? अशी ही सर्व मंडळी आहेत. श्रीकृष्णाने पारिजातकाचे वनच या कलाकारांनी गोव्यात निर्माण केले होते. ते वनच मुंबईत आणले आणि मुंबईत लावले. इथल्या लोकांनी कौतुक केल्याने महाराष्ट्रातील पारिजातक जगभर विख्यात झाले.

ज्या प्रकारे गोवा सरकारने, महाराष्ट्र सरकारने गोपीनाथांचा सन्मान करायला हवा होता, तसा केला गेला नाही. पद्मश्रीची खिरापत वाटताना कोणत्याही सरकारला गोपीनाथांची आठवण झाली नाही. यापुढे तरी ती व्हावी अशी इच्छा रमाकांत खलप यांनी केली. गोपीनाथांच्या प्रत्येक पुण्यतिथीला मुंबईसह गोव्यातही कार्यक्रम करण्याची सूचनाही त्यांनी ट्रस्टला केली.पंचतुंड नरमुंड… या सं. शाकुंतल या नाटकातील नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सुभाष सराफ यांनी सर्वांचे स्वागत केले.

संगीत मानापमान नाटकातील “शुरा मी वंदिले…,” सौभद्र नाटकातील “वद जाऊ कुणाला शरण…,” भावबंध मधील “कठीण कठीण किती.”.., सौभद्रतील “लाल शाल जोडी जरतारी…, मृछकटिकातील “माडीवरी चल ग गडे…,” विद्याहरण मधील ” मधुकर वन वन फिरत करी..”., सुवर्णतुलातील “रतीहूनी सुंदर मदनमंजिरी…,”व ” हे सुरानो चंद्र व्हा..”. अशी बरीच नाट्यपद सादर करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: