IND vs SL T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना भारताने दोन धावांनी जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाच गडी गमावून 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ 160 धावा करू शकला आणि सामना गमावला. भारताने हा सामना दोन धावांनी जिंकला. टी-२० मधील धावांच्या बाबतीत भारताचा हा तिसरा सर्वात लहान विजय आहे. भारतीय वेगवान गोलंदाज शिवम मावीचा हा पदार्पणाचा सामना होता आणि त्याने चार विकेट घेत प्रभावित केले.
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिल आणि इशान किशन या जोडीने भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या षटकात 17 धावा जोडल्या. 27 धावांवर भारताची पहिली विकेट पडली. शुभमन गिल पदार्पणाच्या सामन्यात सात धावा करून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादवही सात धावा करून बाद झाला. संजू सॅमसनही पाच धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर ईशान किशन 37 आणि हार्दिक पांड्या 29 धावा करून बाद झाला.
94 धावांत पाच विकेट्स गमावल्यानंतर टीम इंडियाचा संघर्ष सुरू होता. यानंतर दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांनी 68 धावांची भागीदारी करत भारताची धावसंख्या 5 बाद 162 पर्यंत नेली. दीपक हुडा 41 आणि अक्षर पटेलने 31 धावा करून नाबाद राहिले. श्रीलंकेसाठी कसून राजिता वगळता सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. श्रीलंकेची पहिली विकेट 12 धावांवर पडली. यानंतर दुसरी विकेट 24 धावांवर आणि तिसरी विकेट 47 धावांवर पडली. श्रीलंकेचा निम्मा संघ 68 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. अशा स्थितीत भारताचा विजय जवळपास निश्चित होता.
वानिंदू हसरंगा आणि कर्णधार दासुन शनाका यांनी 40 धावांची भागीदारी करत श्रीलंकेला सामन्यात परत आणले. शिवम मावी आणि उमरान मलिक हे दोघेही बाद झाले पण चमिका करुणारत्नेने डेथ ओव्हर्समध्ये मोठे फटके मारत सामन्यात जीव आणला. शेवटी अक्षर पटेलने शेवटच्या षटकात 13 धावा वाचवल्या आणि भारताने दोन धावांनी सामना जिंकला.
भारताकडून शिवम मावीने 22 धावांत 4 बळी घेतले. तो भारताच्या निवडक गोलंदाजांमध्ये सामील झाला आहे ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यात चार विकेट्स घेतल्या आहेत. उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले. कर्णधार हार्दिक पांड्याने तीन षटकात केवळ 12 धावा दिल्या.