Thursday, October 24, 2024
Homeराजकीयकर्नाटक सरकारची राजरोस दादागिरी मात्र राज्यातील ईडी सरकार अळीमिळी गुपचिळी ! नाना...

कर्नाटक सरकारची राजरोस दादागिरी मात्र राज्यातील ईडी सरकार अळीमिळी गुपचिळी ! नाना पटोले…

केंद्र सरकार व भाजपाच्या आशिर्वादानेच कर्नाटक सरकारचा दंडेली..

विधानभवनच्या पायऱ्यावर महाविकास आघाडीची ईडी सरकारविरोधात आजही जोरदार घोषणाबाजी.

नागपूर – महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही अशा वल्गना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई करत आहेत. सीमावाद प्रश्नी कर्नाटक सरकार दररोज दादागिरी करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्यानंतरही कर्नाटककडून जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या विरोधात गरळ ओकली जात आहे. पण कर्नाटकच्या या दादागिरीसमोर राज्यातील ईडी सरकार मात्र अळिमिळी गुपचिळी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे पण केंद्र सरकार हस्तक्षेप करत नाही. कर्नाटक सरकार जाणीवपूर्वक दादागिरी करत आहे. कर्नाटक, महाराष्ट्र व केंद्रातही भारतीय जनता पक्षाचेच सरकार आहे. पण कर्नाटकची दंडेलशाही ते मोडून काढू शकत नाहीत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक झाली होती पण त्यानंतरही कर्नाटककडून अरेरावी केली जात आहे. हे सर्व केंद्र सरकारच्या आशिर्वादानेच चालले आहे. महाराष्ट्र तोडण्याचा भाजपा व नरेंद्र मोदी यांचा हा डाव आहे आणि दुर्दैवाने महाराष्ट्रातील ईडीचे सरकार डरपोक आहे. कर्नाटक सरकारला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे.

विधिमंडळाच्या पायऱ्यावर आजही महाविकास आघाडीने शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात सकाळी घोषणाबाजी केली. कर्नाटकच्या दादागिरी विरोधातही बोम्मईचा सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या. नागपूरातील भूखंड घोटाळ्याप्रकरण, महापुरुषांचा अपमान या मुद्द्यांवरही घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशाही घोषणा देण्यात आल्या.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: