आकोट – संजय आठवले
आकोट तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी दिनांक २०.१२.२०२२ रोजी नवीन तहसील परिसरात होत आहे. ही मतमोजणी सकाळी ८.०० वाजता पासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने या परिसरात प्रचंड प्रमाणात वाहतूक वाढणार आहे.
त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेत बाधा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतमोजणी शांततेत पार पाडण्याकरिता आकोट पोपटखेड मार्गाची वाहतूक बंद करणे गरजेचे आहे. म्हणून ही वाहतूक सकाळी ७.०० वाजतापासून सायं. ५.०० वाजेपर्यंत बंद ठेवण्याची विनंती तहसीलदार आकोट यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना केली आहे.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी मतमोजणी कालावधीत आकोट पोपटखेड मार्गावरची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आकोट पोपटखेड या मार्ग ऐवजी ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळती करण्यात आली आहे. आकोटवरून पोपटखेड कडे जाणारी वाहने ग्रामीण रुग्णालय आकोटच्या बाजूने जाणाऱ्या जुन्या बोर्डी रस्त्याने बोर्डी गावात तेथून सुकळी फाटा आणि तेथून पोपटखेडकडे न्यावी लागणार आहेत. तर पोपटखेड येथून आकोट कडे येताना पोपटखेड ते सुकळी फाटा तेथून बोर्डी गावात आणि तेथून जुन्या बोर्डी मार्गाने ग्रामीण रुग्णालय आकोटच्या बाजूने शहरात यावे लागणार आहेत.
ही पर्यायी व्यवस्था दिनांक २०.१२.२०२२ रोजीचे सकाळी ७.०० वाजता पासून सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत राहणार आहे. त्यानंतर आकोट पोपटखेड मार्ग वाहतुकी करिता खुला करण्यात येणार आहे. याची नोंद संबंधित वाहतूकदारांनी घ्यावी, असे आवाहन आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख यांनी केले आहे.