Monday, November 11, 2024
Homeगुन्हेगारीअकोला | देशी कट्टा प्रकरणात पोलिसांची एन्ट्री…सौर ऊर्जा कंपनीकडून तिघांची तक्रार…

अकोला | देशी कट्टा प्रकरणात पोलिसांची एन्ट्री…सौर ऊर्जा कंपनीकडून तिघांची तक्रार…

दरम्यान त्या चार आरोपींची सुनावणी टळली…पुढील सुनावणी २३ डिसें. रोजी…

आकोट- संजय आठवले

तळेगाव सौर ऊर्जा प्रकल्प प्रकरणाला आता अनेकानेक धुमारे फुटत असून या ठिकाणी देशी कट्टा आढळून आल्याने आणि सौर ऊर्जा कंपनीने स्थानिक तिघांविरोधात पोलीस तक्रार केल्याने या प्रकरणात आता पोलिसांची एन्ट्री झाली आहे. यादरम्यान या प्रकल्पात वन्य पशुंची शिकार केल्याचे आरोपातील ४ जणांनी अटकपूर्वक जामीनाकरिता केलेल्या अर्जावरील आजची सुनावणी टळली असून येत्या २३ डिसें. रोजी ही सुनावणी मुक्रर करण्यात आली आहे.

तेल्हारा तालुक्यातील तळेगाव सौर ऊर्जा प्रकल्पात देशी कट्टा सापडल्याने या प्रकरणातील गुढ वाढतच चालले आहे. वन अधिकाऱ्यांनी हा देशी कट्टा जप्त केल्यानंतर या ठिकाणी आकोट उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर आणि हिवरखेड ठाणेदार चव्हाण यांनीही भेट देऊन तपासणी केली आहे. या तपासणीत पोलिसांना काय गवसले हे मात्र समजलेले नाही. मात्र या ठिकाणी आढळून आलेल्या देशी कट्ट्यामुळे पोलीसही चक्राऊन गेले आहेत. याच दरम्यान वनविभागाने या प्रकरणात देशी कट्टा सापडल्याची माहिती लिखित स्वरूपात हिवरखेड पोलीस ठाण्याला कळविली आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसी पद्धतीनेही तपास होण्याची शक्यता आहे.

इकडे ही घडामोड होत असतानाच दुसरीकडे सदर सौर ऊर्जा कंपनीकडून तेल्हारा तालुक्यातील १ व आकोट तालुक्यातील २ अशा ३ व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे तिघेजण कंपनीला ब्लॅकमेल करीत असल्याचे कंपनीच्या तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे. या तक्रारीने या प्रकरणातील गुंता वाढतच चालला असून वन्य पशुंची शिकार, देशी कट्टा बाळगणे, आणि आता ब्लॅकमेल अशा तीन गंभीर गुन्ह्यांच्या तावडीत हा प्रकल्प सापडला आहे.

ADS

महत्त्वाचे म्हणजे हा प्रकल्प मुळातच बेकायदेशीरपणे उभारला गेल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हा प्रकल्प उभारताना सक्षम अधिकाऱ्याचे परवानगी विना येथील मोठमोठे वृक्ष तोडून टाकण्यात आले आहेत.असे येथील शेतकरी सांगतात. ह्या प्रकल्पालगत भल्या मोठ्या ई क्लास जमिनीवर जंगल आहे. चांगलेच दाट असल्याने या जंगलात वन्य पशूंचा निवास आहे. ह्या जंगलालगत नदी वाहत असल्याने तेथे वन्य पशूंची तहान भागविली जाते. मात्र हा प्रकल्प उभारताना या नदीत भराव टाकून वन्य पशुंचा हा पाणवठा या कंपनीने नष्ट केला आहे. सोबतच नैसर्गिक प्रवाह रोखण्याचाही अपराध केला आहे. यासोबतच या ई क्लास जमिनीतील जागाही या कंपनीने बळकावून प्रकल्पात समाविष्ट केली असल्याचे शेतकर्‍यांचे मत आहे. याप्रकरणी चौकशी करीत असलेला वनविभागही हा प्रकल्प उभारताना आपल्या विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे वरील तीन गंभीर गुन्ह्यांसह हा प्रकल्प अनेक अपराधांचे केंद्रस्थान बनलेला असल्याचे दिसून येते. परिणामी वनविभाग व पोलीस विभागासह महसूल विभागानेही या प्रकल्पाच्या चौकशीत सामील व्हावे असे अनेकांचे मत आहे.

त्यानुसार या प्रकरणी भूमिका घेण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. मात्र तत्पूर्वी वन्य पशु शिकार प्रकरणी फरार असलेल्या आरोपींना अटक होणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या अटकेनंतर तपासात बरीच महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील ३ आरोपी जामिनीवर सुटलेले आहेत. १ आरोपी अटकपूर्वक जामीनप्राप्त आहे. ८ आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला गेला आहे. तर उर्वरित ४ आरोपींच्या जामिनावरील दिनांक १७ डिसेंबरची सुनावणी टळली आहे. पुढील सुनावणी २३ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. इतर ८ आरोपींप्रमाणे हे ४ आरोपीही फरार घोषित असले तरी हे चौघेही आपल्या घरीच असल्याची माहिती आहे. यातील चिराग वगरिया हा मुंबई येथे, पवन रणपिसे हा पुणे येथे, सौरभ नलावडे हा सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याच्या कवलापूर येथे तर प्रभात सिंह ठाकुर हा मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्याच्या रामपूर तालुक्यात येणाऱ्या सांगूणी येथे राहत आहे. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मिळण्यापूर्वी वनविभागाने त्यांचे शोधार्थ प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होते याकडे लक्ष लागलेले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: