Friday, September 20, 2024
Homeराज्यअकोला । जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश...पोलीस विभागाने...

अकोला । जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश…पोलीस विभागाने सतर्क राहणे गरजेचे…

आकोट – संजय आठवले

सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. यावेळी सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होत आहे. त्यामुळे मतदारांना आकृष्ट करण्याकरिता उमेदवारांकडून विविध प्रकारच्या खाजगी योजना राबविल्या जात आहेत. त्यामध्ये दारू वाटप योजना ही उमेदवार व मतदार या दोघांकरिताही अतिशय लाभदायी योजना आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदारांना पटविण्याकरिता दारू वाटप हे प्रभावी आयुध मानले जाते.

अनेक जणांना वाटते की नेहमी दिसणारे दारूबाजच केवळ दारू पितात. परंतु वास्तव हे आहे की समाजात सभ्यतेच्या बुरख्याआड दडलेले बहुतांशजण दारू पितात. त्यामुळे निवडणूक काळात उमेदवारांचा दारूवर प्रचंड खर्च होत असतो. विशेष म्हणजे मतदारांना आकर्षित करणे हा उमेदवारांचा उद्देश असतोच. परंतु गावातील टग्यांना दारू पाजून त्यांचे द्वारे मतदारांवर दबाव निर्माण करण्याकरिताही दारूचे शस्त्राचा वापर केला जातो.

सोबतच प्रतिस्पर्धी उमेदवारालाही अशा दारूबाज गावगुंडांच्या माध्यमातून दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला जातो. परिणामी लायक असूनही अनेक उमेदवारांना फटका बसतो. आणि लायक खुर्चीवर नालायकांचा कब्जा होतो. त्यामुळे मुक्त व खुल्या वातावरणात निवडणुका घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या मूळ उद्देशाला सुरुंग लावल्या जातो. असे होऊ नये आणि अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका शांततेने पार पडाव्या या उद्देशाने अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्यात मद्यविक्रीस बंदी घातली आहे.

अनुज्ञप्ती धारकांना दिलेल्या आदेशात त्यांनी फर्मावले की, मतदाना आधीचा दिवस म्हणजे १७.१२.२०२२, मतदानाचा दिवस म्हणजे १८.१२.२०२२ व मतमोजणीचा दिवस म्हणजे २०.१२.२०२२ असे तीन दिवस मद्यविक्री बंद ठेवण्यात यावी. या आदेशानुसार हे नियोजित तीन दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे.

परंतु या संदर्भातील अनुभव असा आहे की, दर निवडणुकीत अशी तीन दिवस मद्यविक्री बंद ठेवण्यात येते. त्यावेळी उमेदवार मद्यविक्री सुरू असतानाच दारूचा साठा करून ठेवतात. हा साठा वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो. आणि तेथून दारूबाजांना दारूचा पुरवठा केला जातो. त्यानुसार आज दिनांक १६ पासूनच मद्यविक्री दुकानांमधून मतदारांकरिता साठा करून ठेवावयाची दारू बाहेर निघणार आहे. विशेषता आजची रात्र दारू वाहतुक करण्याकरिता महत्त्वाची रात्र राहणार आहे.

त्यामुळे आज दिवसभर आणि रात्रभर पोलिसांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. यासोबतच अनेक ठिकाणी असे निदर्शनास आले आहे की, निवडणूक काळात गावातील शांतता व सुव्यवस्था पाहणीकरिता पोलीस पथक गावात जाते. तेथे औपचारिक बाबींची पूर्तता केल्यानंतर पोलीस पथकाला विशिष्ट व्यक्ती आपल्या घरी चहापानाकरिता नेतो. ती व्यक्ती एक तर उमेदवार असते किंवा उमेदवाराची निकटस्थ असते. अशा घरी चहापान केल्याने आपोआपच त्या व्यक्तीचा मतदारांवर प्रभाव पडतो.

त्याने मतदानही प्रभावित होते. महत्त्वाचे म्हणजे असा प्रयोग हेतूपुरस्सरपणे केला जातो. हा प्रयोग बहुतांश धूर्त, कावेबाज आणि ज्यांचे काळे धंदे आहेत असे लोकच करतात. याचाही लायक आणि सभ्य उमेदवाराला फटका बसतो. त्यामुळे मतदान प्रभावित करण्याकरिता अशाप्रकारे होत असलेला आपला वापर होऊ नये याकरिता पोलिसांनी सतर्कता बाळगणे काळाची गरज आहे. त्याकरिता निवडणूक काळात उगीच चहापानाकरिता जाणे पोलिसांकडून टाळले जाणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: