संजय आठवले, आकोट
आकोट येथील मोठे बारगण पानटाई येथे एका मानसिक विकृत युवकाने तीन जणांवर खुनी हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली असून लोकांनी हल्लेखोरास शिताफिने पकडून पोलिसांचे हवाली केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना अकोला येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ह्या परिसरात ह्या हल्लेखोराची दहशत पसरली असून त्याला कारागृहातच ठेवण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांची आहे.
ह्या हल्ल्यासंदर्भात घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार रुपेश ज्ञानेश्वर हेंड मोठे बारगण पानअटाई नजीक असलेल्या नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक पाच चे पाठीमागील वस्तीत राहतो. त्याने आज दिनांक 9 ऑगस्ट चे पहाटे साडेआठ वाजता स्वतःचे घराबाहेर पडून आनंद रतन आवंडकार वय 19, रवी रामभाऊ रंधे वय 35, व देविदास श्रीकृष्ण रेखाते वय 40 ह्या तिघांवर पान मळ्यात दैनंदिन कामाकरिता वापरण्यात येणाऱ्या कोतीने खुनी हल्ला चढविला. त्यात आनंद व रवी हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची खबर अकोट शहर ठाणेदार प्रकाश अहिरे यांना मिळताच त्यांनी आपले पोलीस पथक ताबडतोब घटनास्थळी रवाना केले. ह्या पथकाने लोकांनी पकडून ठेवलेल्या हल्लेखोर रुपेश हेंड ह्यास ताब्यात घेतले. त्यानंतर आनंद व रवी ह्या दोघांना अकोला येथे उपचारार्थ पाठविण्यात आले आहे.
ह्या हल्ल्याचे कारणांचा शोध घेतला असता माहिती मिळाली की, रुपेश हेन्ड हा मानसिक रुग्ण आहे. कोरोना काळापूर्वीपासूनच त्याचेवर अकोला येथील उपचार सुरू होते. कोरोना काळात तो त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे नियमित तपासणीसाठी गेला होता. परंतु जाताना त्याने केवळ औषधी लिहून दिलेला कागदच सोबत नेला. रोगासंबंधी विस्तृत माहिती असलेली फाईल त्याने घरीच ठेवली. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला फाईल घेऊन येण्यास सांगितले. त्यावर रुपेश तडक आकोट येथे आपले घरी आला. डॉक्टरांनी काहीच औषध दिले नसल्याचे त्याने आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर तो औषधाविनाच राहिला. त्यामुळे त्याला पुन्हा त्रास होऊ लागला. म्हणून त्याचे आईने त्याला आकोट येथील डॉक्टरांकडे नेले. त्यांनी त्याला औषधे दिलीत. त्याने रुपेशला आराम पडू लागला. परंतु ही औषधे किती काळ घ्यावी लागतील या विचाराने तो पुन्हा अस्वस्थ झाला. त्यावर डॉक्टरांनी त्याला तीन दिवसाआड औषधी घेण्यास सांगितले.
परंतु गत काही दिवसांपासून त्याने ते औषध घेणेही बंद केले. रुपेश हा मिळेल ती मोलमजुरीची कामे करतो. तरी तो कधीच सकाळी नऊ-साडेनऊ वाजेपर्यंत झोपेतून जागा होत नाही. मात्र आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी तो पहाटे पाच वाजताच जागा झाला. आई-वडिलांना जागे करून त्याने आपले डोके भयंकर दुखत असल्याचे सांगितले. त्यावर त्याचे आईने चहा करून देते असे त्याला सांगितले. परंतु त्याने पान अटाईवर जाऊन तेथे चहा घेतला. आपल्याकडे बाकी असलेले चहा वाल्याचे तीनशे रुपये त्याला दिले. नंतर घरी येऊन त्याने टीव्ही सुरू केला. त्यावर त्याला त्याचे आईने टोकले. त्यामुळे त्याने घरातील टीव्ही संच फोडून टाकला. व पानमळ्यात वापरली जाणारी कोती घेऊन तो घराबाहेर पडला. घराबाहेर पडताच थोड्या अंतरावर त्याला रवी रंधे दिसला. कुणाचे काही ध्यानीमनी नसताना रुपेशने रविवर कोतीने वार केले. इतक्यात समोरून आनंद आवंडकर हा स्पर्धा परीक्षा शिकवणी वर्गात जाण्यासाठी समोरून येत होता. त्याला पाहताच रुपेशने रविला सोडून आनंद वर वार केले. अचानक वार झाल्याने गांगरलेला आनंद तेथून धावत सुटला. हातातील कोती परजीत रुपेश त्याचे मागोमाग पानटाईवर आला. पान अटाईवर पहाट पासूनच विड्याची पाने विक्री सुरू होत असल्याने ह्या ठिकाणी असंख्य लोक नेहमीप्रमाणे वावरत होते.
त्यातच रुपेश च्या घराशेजारीच राहणारा देविदास रंधे हा घराकडे परतताना नेमका रुपेश च्या समोर आला. तो दिसताच रुपेशने त्याचे वरही हल्ला चढविला. हे दृश्य पाहताच लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. हातातील कोती नाचवित रुपेश थैमान घालीत असताना त्याचे वडिलांनी त्याला अडविण्याचा प्रयास केला. तेव्हा रुपेश त्यांनाही कोतीचा धाक दाखवीत होता. अशातच चेतन केशवराव थोरात ह्या युवकाने गोडी गुलाबीने बोलून त्याचे हातातील कोती काढून घेतली. कोती काढून घेताच लोकांनी रुपेशला पकडले. त्यानंतर ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्याशी संपर्क करून पोलीस दलाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी रुपेशला ताबडतोब ताब्यात घेतले. त्याचे वर भादवी कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक राजेश जावरे हे पुढील तपास करीत आहेत.
या संदर्भात व्यावसायिक विनोद धर्मे यांनी सांगितले की, रुपेशला कोणतेही व्यसन नाही. परंतु घरची गरिबी व त्यामुळे अविवाहित राहिल्याने तो नेहमी विचारग्रस्त राहतो. सहसा कुणात मिसळत नाही. कुणाशी जास्त बोलत नाही. यापूर्वी त्याने असा प्रकार कधीही केलेला नाही. परंतु ह्या खूनी हल्ल्याने ह्या भागात दहशत पसरली आहे. विशेषता महिलांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रुपेश चा जामीन न घेता त्याला कारावासातच ठेवण्यात यावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे. विशेष म्हणजे रुपेश चे वडिलांनीही ह्याला आपली संमती दर्शविली आहे.