सहा. उपनिबंधकांनीही दिला गुंगारा… बाजाराबाहेर घडामोडींना वेग…
आकोट – संजय आठवले
आकोट बाजार समितीचे मुख्य प्रशासक व व्यापारी यांच्यातील वाद सोडविण्याकरिता बोलाविण्यात आलेल्या संयुक्त बैठकीला शेतकरी पॅनलच्या नेत्यांखेरीच कोणीच हजेरी न लावल्याने ही बैठक बारगळली असून या बैठकीचे आयोजन करणाऱ्या सहा. उपनिबंधक खाडे यांनीही गुंगारा दिल्याने चिडलेल्या शेतकरी पॅनलच्या समक्ष सोमवारी बाजार सुरू करण्याची तोंडी सूचना खाडेंंनी बाजार समिती सचिवांना दिली आहे.
वाचकांना स्मरत असेल की, आकोट बाजार समितीमध्ये कापूस खरेदी बंद झाल्याने हा:हा:कार माजलेला आहे. ही खरेदी सुरू करण्याकरिता शेतकरी पॅनलच्या नेत्यांनी बाजार समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र मुख्य प्रशासक आणि अन्य प्रशासकांपैकी कोणीच त्याची दखल घेतली नाही.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व त्याखालील नियम १९६७ मधील तरतुदीनुसार बाजार समितीमध्ये शेतमाल खरेदी विक्रीचे सौदे तीन किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी करिता बंद राहणार नाहीत याची दक्षता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी घ्यायची आहे. त्याकरिता अकोला जिल्हा उपनिबंधक कहाळेकर यांचे कानावर ही परिस्थिती घातली गेली. परंतु सुरुवातीला त्यांनी ही बाब कानावरच घेतली नाही.
नंतर त्यांच्याशी वारंवार संपर्क केल्यावर त्यांनी आकोटचे प्रभारी सहा. उपनिबंधक खाडे यांना परिस्थितीचा निपटारा करण्याकरिता आकोट येथे पाठविले. त्यावेळी खाडे यांनी व्यापारी व उपोषणकर्त्यांशी स्वतंत्र चर्चा केली. या चर्चेवेळी मात्र परिस्थितीवर तोडगा काढण्याऐवजी तेथून सटकण्याचीच त्यांची तयारी असल्याचे जाणवत होते.
त्यामुळे त्यांनी रविवार दिनांक ११ डिसेंबर रोजी प्रशासक, व्यापारी, शेतकरी पॅनलचे नेते व कास्तकार यांची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेतला. त्या बैठकीत तोडगा काढून सोमवार दिनांक १२ डिसेंबर रोजी कापूस खरेदी सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी उपोषणकर्त्याना सांगितले त्या आश्वासनामुळे शेतकरी पॅनलच्या नेत्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
त्यामुळे रविवारी होणाऱ्या बैठकीकडे सार्यांचे लक्ष लागलेले होते. मात्र या बैठकीला शेतकरी पॅनलच्या नेत्यांनी खेरीज कुणीच हजर झाले नाही. स्वतः सहा. उपनिबंधक खाडे हेही अनुपस्थित राहिले. त्यामुळे शेतकरी पॅनलचे नेते चांगलेच भडकले. त्यांनी समिती सचिवांच्या कक्षात ठिय्या मांडून खाडे यांनी मान्य केल्यानुसार सोमवारी कापूस बाजार सुरू करण्याची मागणी केली.
परंतु व्यापाऱ्यांचा पेच कायम असल्याने व कोणतीच पर्याय व्यवस्था न झाल्याने आपण तसे करण्यास असमर्थ असल्याचे सचिवांचे म्हणणे होते. त्यावर शेतकरी पॅनलच्या नेत्यांनी सचिवांना खाडेंशी संपर्क करण्यास सांगितले. हा संपर्क झाल्यावर “ठरल्याप्रमाणे सोमवारी बाजार सुरू करा” अशी तोंडी सूचना खाडे यांनी समिती सचिवांना केली. परंतु व्यापाऱ्यांचा पेच कायम असल्याने समिती सचिवांना काय करावे हेच सुचत नव्हते.
हा प्रकार घडत असताना मुख्य प्रशासक गजानन पुंडकर यांनी मात्र शेतकरी पॅनलच्या नेत्यांना काहीही लिहून देऊ नका अशी सूचना समिती सचिवांना केली. त्यामुळे चिडलेल्या शेतकरी पॅनलच्या नेत्यांनी सोमवारी बाजारात आलेला कापूस समितीला खरेदी करावाच लागेल असा पवित्रा घेतला. त्यामुळे सोमवारी बाजारात आलेल्या कापसाची समितीकडून विल्हेवाट लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशाप्रकारे सोमवारी बाजार सुरू करून शेतकरी पॅनलचे नेते जिल्हा उपनिबंधक कहाळेकर यांचे भेटीस जाणार आहेत.
तिथे सहा. निबंधक खाडे यांची तक्रार करण्यात येणार आहे. त्यावर योग्य प्रतिसाद न मिळाल्यास हे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी करणार आहे. एकीकडे हा घटनाक्रम सुरू असतानाच दुसरीकडे मात्र बाजार समिती बाहेर मुख्य प्रशासक आणि व्यापारी यांचे दरम्यान तह होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्याकरिता सुप्रसिद्ध व्यावसायिक नवनीत लखोटीया व नवीन चांडक यांनी मुख्य प्रशासक गजानन पुंडकर यांचेशी चर्चा केली आहे.
त्यामुळे सोमवारी २० व्यापाऱ्यांच्या परवान्याचे निलंबन मागे घेतले जाणार आहे. त्यानंतर ह्याच वादग्रस्त व्यापार्यांकरवी मंगळवारी कापूस खरेदी सुरू होणार आहे. यावरून मुख्य प्रशासक व व्यापारी या दोन्ही बाजूंनी नरमाईची भूमिका घेतली जात असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे अखेरीस हेच होणार होते तर मग सुरुवातीलाच दोन्ही पक्षांकडून अडेलतट्टूपणाची भूमिका का घेतली गेली? एकमेकांवर आरोप प्रत्यारोप का करण्यात आले? शेतकऱ्यांची परवड का करण्यात आली? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु मुख्य प्रशासक व व्यापारी यांचे दरम्यान काहीही घडले असले तरी कापूस बाजार सुरू होऊन कास्तकारांना दिलासा मिळणार ही समाधानाची बाब आहे.