आकोट- संजय आठवले
कापसाच्या सौदा पट्टीवर लिहिल्या जात असलेल्या चार निरर्थक शब्दांमुळे आकोट बाजार समितीमध्ये सद्यस्थितीत व्यापारी व प्रशासकांमध्ये वाद पेटल्याने समिती प्रशासनाने २० कापूस व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करून दंड थोपटले असतानाच व्यापाऱ्यांनी मात्र चर्चेविना निर्माण झालेल्या या वांध्यावर चर्चेद्वारे तडजोड काढण्यास सहमती दर्शविली आहे. त्यानुसार यावर चर्चा होऊन तडजोड न निघाल्यास हजारो शेतकरी व कर्मचाऱ्यांचे मात्र अतोनात नुकसान होणार असल्याचे दिसत आहे.
आकोट बाजार समितीमध्ये सद्यस्थितीत कापूस खरेदीचा काळ आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसाची आयात सुरू आहे. मात्र ६ डिसेंबर रोजी अचानक कापसाची चालू खरेदी बंद करण्यात आली. त्यात प्रशासकांनी कठोर भूमिका घेतली. तर व्यापाऱ्यांनी असहकार पुकारला. कापसाच्या सौदा पट्टीवर “ओला हलका माल वापस” या चार निरर्थक शब्दांवरून हा वांधा निर्माण झाला आहे. वास्तविक सारे प्रशासक व व्यापारी यांनी सामूहिक चर्चा करून हा वाद टाळता आला असता. परंतु या संदर्भात कोणतीही चर्चा न करता मुख्य प्रशासक गजानन पुंडकर यांनी कायदा दाखविला. त्याने व्यापारी नाराज झाले. परिणामी कापूस खरेदी बंद झाली. त्यावर व्यापाऱ्यांनी पत्र परिषद बोलावून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते कापूस सौदा पट्टीवर “ओला हलका माल वापस” हे चार शब्द कैक वर्षांपासून लिहिणे सुरू आहे. हे चार शब्द सौदा पट्टीवर नमूद करणे हे कायदेशीरही नाही आणि बेकायदेशीरही नाही. तर कापूस जिनात आल्यावर विक्री दाराशी वितंडवाद होऊ न देण्याकरिता केलेली ती एक सोय आहे. ती अशी की, बाजार प्रांगणात शेतकरी व व्यापारी हे दोघेही कापूस आणतात. त्यांचे वाहनाच्या मागील बाजूने काही कापूस बाहेर काढून त्याचा ओलावा, त्याचा रंग, त्याचा धागा निर्मितीचा दर्जा आणि त्यातील काडीकचरा याची तपासणी करून त्याचा भाव ठरविला जातो. तेथून ते वाहन खरेदीदाराच्या जिनात आणले जाते. तिथे कापूस खाली करताना त्याचे आत कधीकधी ओला अथवा हलका कापूस आढळतो. त्यावेळी व्यापाऱ्याचा विक्रीदाराशी वांधा निर्माण होतो. अशावेळी बाजार समितीमधील कार्यरत वांधा समितीचा प्रतिनिधी घटनास्थळी येतो. तिथे विक्रीदार व खरेदीदार आणि तो प्रतिनिधी हे चर्चेद्वारे या कापसाचा दर ठरवून वाद मिटवितात. अशावेळी एखादा विक्रीदार तिरसट स्वभावाचा असतो. त्याने काही अघटीत करू नये, यासाठी हे चार शब्द सौदापट्टीवर गेली अनेक वर्षे लिहिले जात आहेत. परंतु यामुळे आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस परत केला गेला नाही. वांधा समितीद्वारे तडजोड होऊन तो नेहमीच खरेदी केला गेला आहे. असा दावा व्यापाऱ्यांनी केला.
सहसा हा प्रकार शेतकऱ्यांसोबत होतच नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. हे चार शब्द वर्तमान मुख्य प्रशासक सभापती असतानाही सौदा पट्टीवर लिहिले जात होते. मग आजच या शब्दांची इतकी “एलर्जी” का? असा प्रश्नही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.
व्यापाऱ्यांच्या ह्या माहितीमुळे पूर्वापार चालत असलेल्या या चार शब्दांचा मुख्य प्रशासकांनी आजच इतका बाऊ का करून घेतला? हे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. व्यापारी नवीन बाजार समिती सुरू करण्याचा डाव रचित आहेत या मुद्द्यावर व्यापाऱ्यांनी सांगितले की, ह्या बाजार समितीवर शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्याशी आमचे पिढी दर पिढीचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे हे शेतकरी नव्या समितीत शेतमाल नेतच नाहीत. आणि आमचाही त्या समितीशी संबंध नाही. त्या नव्या बाजाराचे नावावर आम्हाला उगाच बदनाम केले जात आहे. २० कापूस व्यापाऱ्यांच्या पंधरा दिवसांकरिता निलंबित परवान्यांबाबत व्यापाऱ्यांनी सांगितले की, आकोट तालुक्यात २२ जिन आहेत. त्यात एक हजाराचे वर मजूर, कामगार काम करतात. पंधरा दिवस कापूस खरेदी बंद झाल्याने रोजंदारीने काम करणारे हे सारे मजूर बेरोजगार होणार आहेत. अतिशय अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसणार आहे. बाजार समितीचा सेसही बुडणार आहे. त्याचा प्रशासकांनी विचार करायला हवा. महत्त्वाचे म्हणजे बाजार समितीने दिलेल्या प्रत्येक आदेशाचे व्यापाऱ्यांनी पालन केले असून करोडो रुपयांचा सेसही त्यांनी कोणतीही कुरकुर न करता भरला आहे.
मुख्य प्रशासकांच्या अशा वर्तनाने शेतकरी, व्यापारी, मजूर, कर्मचारी आणि बाजार समिती यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे या प्रश्नावर चर्चा करून तोडगा काढण्यावर आपण राजी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
या संदर्भात मुख्य प्रशासक गजानन पुंडकर यांच्याशी संपर्क साधला असता, २० व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित केल्याचे त्यांनी सांगितले. परंतु त्या बदलीत कापूस खरेदीची कोणती पर्यायी व्यवस्था केली? या प्रश्नाचे ते उत्तर देऊ शकले नाहीत. चार-पाच दिवसात ती व्यवस्था करू असे ते म्हणाले. पण ती व्यवस्था नेमकी कशी असेल? याचे उत्तर मात्र ते देऊ शकले नाहीत. बाजार समितीत वांधा समिती असल्याने सौदापट्टीवर “ओला हलका माल वापस” या शब्दांना अर्थच उरत नाही. त्यामुळे त्या शब्दांचा इतका बाऊ का निर्माण केला गेला? या प्रश्नाचेही ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. आमचे बाबत शेतकऱ्यांची तक्रार नसल्याचा व्यापाऱ्यांच्या दाव्यावर त्यांनी अशा असंख्य तक्रारी असल्याचे सांगितले. पण त्या तक्रारदारांची नावे मात्र त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे केवळ अहंगंडाचे आहारी जावून “ओला हलका माल वापस” या निरर्थक चार शब्दांवर मुख्य प्रशासक व व्यापारी हे उगाच वाद पेटवून त्यात हजारो शेतकऱ्यांची होळी करीत असल्याचे चित्र दिसत आहे.