7 sixes in one over : आजवर कुठलाही क्रिकेटपटू करू शकला नाही ते रुतुराज गायकवाड यांनी करून दाखविले आहे. महाराष्ट्राच्या या युवा सलामीवीराने विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशविरुद्ध एका षटकात सलग सात षटकार ठोकले. त्याने नो बॉलवर षटकार ठोकला, तर या षटकात एकूण 43 धावा झाल्या. यासोबतच त्याने या सामन्यात द्विशतकही पूर्ण केले. डावातील 49 वे षटक करणाऱ्या शिवा सिंगच्या षटकात त्याने हा पराक्रम केला.
त्याने 159 चेंडूत 10 चौकार आणि 16 षटकारांसह नाबाद 220 धावा केल्या आणि त्याच्या संघाने 50 षटकात 330 धावा केल्या. T20 विश्वचषक 2007 मध्ये युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात सहा षटकार ठोकले, तर त्याच्या आधी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये हा पराक्रम केला होता. आता गायकवाडने एका षटकात 7 षटकार मारून इतिहास रचला.
या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर उत्तर प्रदेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जे काही घडले, त्याची त्याला अपेक्षा नसावी. गेल्या सामन्यात मुंबईला पराभूत करण्यास भाग पाडणाऱ्या यूपीवर महाराष्ट्राचा सलामीवीर रुतुराजने एकहाती पाऊस पाडला.