अमरावती : अमरावतीत फ्रेजरपुरा पोलिसांचा बेजाबदारपणा समोर आल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या निगराणीत खाजगी रुग्णालयात उपचार घेत असणारा आरोपी चक्क पोलिसांसमोरच फरार झाल्यामुळे पोलिसांवर मोठ प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रेडियंट या खाजगी रुग्णालयातून शनिवारी पहाटे हा प्रकार घडला.
असा आहे घटनाक्रम…शहरातील जुन्या महामार्गावर एका दारूच्या दुकानात सहा नोव्हेंबरला सायंकाळी गोलू चौधरी आणि बबलू गाडे यांच्या गटात हाणामारी झाली होती. या प्रकरणात फ्रिजरपुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौघा जणांना ताब्यात घेतले होते. तर सात ते आठ जण पसार झाले होते. पोलिसांनी अटक केलेल्या चौघांपैकी गोलू चौधरी आणि बबलू गाडे हे गंभीर जखमी असल्यामुळे गोलू चौधरीला नागपूर येथील खाजगी रुग्णालयात तर बबलू गाडे याला येथील रेडियंट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
शनिवारी सकाळी रेडियंट रुग्णालयात उपचार घेणारा बबलू गाडे हा पोलिसांसमोर लघवी करण्यासाठी शौचालयात गेला आणि तिथून पसार झाला. रुग्णालयातून आरोपी पसार झाल्याचे कळताच रुग्णालयात तैनात दोन्ही पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. रुग्णालयातून आरोपी पसार झाल्यामुळे रुग्णालयात तैनात फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांनी दिली.