आकोट – संजय आठवले
गत कैक वर्षांपासून श्रावण मासाच्या चौथ्या सोमवारी निघणारी कावड शोभायात्रेची परंपरा कायम ठेवित यंदाही हर हर महादेव च्या गजरात आकोट शहरामध्ये कावड शोभायात्रा संपन्न झाली.
ही शोभायात्रा बघण्याकरिता संपूर्ण तालुक्यातील लोकांनी शहरातील रस्त्यांवर प्रचंड गर्दी केली असून शहरातील अवघी तरुणाई भगवान शंकराच्या गीतांवर मनमुराद थिरकताना दिसत होती.
दरवर्षी श्रावण मासाच्या चौथ्या सोमवारी आकोट शहरात भव्य कावड शोभायात्रा काढण्याची परंपरा आहे. त्याकरिता गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल आणून त्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जातो.
ती परंपरा कायम राखत यंदाही ही कावड शोभायात्रा संपन्न झाली. मागील वर्षी या यात्रेत २७ कावड मंडळांनी सहभाग घेतला होता. यंदा त्यात २ मंडळांची भर पडली. परंतु वेळेवर एक मंडळ यात्रेत सहभागी न झाल्याने एकूण २८ मंडळे या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
यंदा या यात्रेमध्ये दर वेळेपेक्षा अधिक गर्दी असल्याचे जाणवले. कावड शोभायात्रेत सहभागी मंडळांसोबतच यात्रेच्या मार्गावर असंख्य भाविक दाटीवाटीने उभे होते. त्यामध्ये महिला, बालके व पुरुषांचा सहभाग होता.
यावेळी मंडळांनी वेगवेगळ्या झाॅंकी तयार केल्या होत्या. त्यामध्ये दरवर्षीपेक्षा अधिक कल्पकता जाणवत होती. कावड मंडळांनी चक्क एक महिन्यापासून या शोभायात्रेची तयारी सुरू केली होती. यात्रेत प्रत्यक्ष सहभागी झाल्यावर या मंडळांचे एक महिन्याचे परिश्रम सार्थकी लागल्याचे जाणवत होते.
या कावड शोभायात्रा मार्गावर अनेक मोक्याचे ठिकाणी शहरातील युवकांनी फराळ व पेयपानाची उत्तम व्यवस्था केली होती. त्यामुळे कावड धारींना टप्प्याटप्प्यावर ऊर्जा प्राप्त होत होती.
या सर्व सहभागाची गोळा बेरीज केली असता या कावड यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण शहरातील जनमानस एकवटला असल्याचे जाणवत होते. या शोभा यात्रेमध्ये पोलीस यंत्रणाही पूर्णपणे दक्ष होती. त्यांच्यासोबतच शांतता समितीच्या सदस्यांनीही कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता परिश्रम घेतले.