नरखेड – डेंगू सदृश्य आजाराने आज एका तरुणाचा मृत्यू झाला . प्रशासन मात्र डेंगू नसल्याचे म्हणत आहे. त्यामुळे नागरिक प्रशासना विरुद्ध संताप व्यक्त करीत आहे. वृषभ चंद्रशेखर कहाते वय २३ वर्षे असे मृत तरुणाचे नाव असून नागपूर जिल्हा भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सरला कहाते यांचा तो धाकटा मुलगा आहे.
काल दि ६ रोजी रात्री वृषभ ची अचानक प्रकृती बिघडली त्यापूर्वी त्याला ताप होता. त्याची टेस्ट रिपोर्ट यायला उशीर झाला होता. अचानक ताप वाढल्याने गंभीर रित्या त्याची प्रकृती बिघडली.
मध्यरात्री त्याला नागपूर ला उपचाराकरिता नेत असताना वाटेतच त्याचा उलटी होऊन मृत्यू झाला . त्याचा ताप १०८ फँरणाईड च्याही वरती गेला असे मृताचे वडील सेवानिवृत्त शिक्षक चंद्रशेखर कहाते यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून नरखेड शहरात तापाच्या रुग्णांत लक्षवेधी वाढ झाली आहे. यात व्हायरल , टायफाईड , मलेरिया च्या तापाचा समावेश आहे. अश्यात काही रुग्णांना डेंगू सदृश्य लक्षणे दिसू लागल्या मुळे रक्ताचे नमुने घेऊन नागपूरला पाठविले . नागपूरवरून रिपोर्ट यायला चार दिवसाचा अवधी लागतो त्यामुळे डेंगू वर उपचार होऊ नाही शकत.
अश्यातच रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊन त्यांना मृत्यू ओढवू शकतो. नगर परिषद प्रशासनाने गावात वाढलेले गवत, नाल्यामध्ये तेलाची फवारणी न करणे, फॉगिग मशीन द्वारे धुरफवारणी न करणे , खड्यामधे साचलेले पाणी याचा बंदोबस्त न करणे यामुळे नरखेड मध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
ग्रामीण रुग्णालयात मलेरिया विभागाच्या कर्मचाऱ्याचे रिक्त असलेले पद त्यामुळे वैद्यकीय सर्वे होऊ शकत नाही. या सर्वाचा परिणाम प्रशासनाविरुद्ध नागरिकांत मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. मलेरिया विभागाच्या कर्मचाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करून सर्वे करावा . रक्त तपासणीच्या सर्व सुविधा ग्रामीण रुग्णालयात तात्काळ उपलब्ध करून द्याव्या. डेंगू च्या उपचारातील प्राथमिक सुविधा ग्रामीण रुग्णालयात उपलब्द कराव्या अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.