आकोट – संजय आठवले
अमरावती यवतमाळ मार्गावरील पोहरा घाटात आकोट तालुक्यातील पाच युवा शेतकऱ्यांच्या वाहनाचा अपघात होऊन त्यात एक जण जागीच ठार झाला आहे तर अन्य चार जणांवर अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या वार्तेने आकोट तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले असून कपाशी बियाण्याकरिता झालेल्या या अपघाताने राज्य शासन व्यवस्थेबाबत प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गत अनेक दिवसांपासून अकोला जिल्ह्यात अजित १५५ या कपाशी बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र हा तुटवडा कृत्रिम असून हे नफेखोरांचे षडयंत्र असल्याचे शेतकरी बोलत आहेत. आकोट तालुक्यात कधी नव्हे ते यावेळी या कपाशी बियाण्याकरिता लांबचलांब रांगा लागत आहेत. नवलाईची बाब म्हणजे यापूर्वी बियाणे खरेदी करिता दुकानावर महिला आल्याचे पाहण्यात अथवा ऐकिवात नव्हते. परंतु यंदा ते दृश्यही अवलोकावयास मिळाले.
पहाटेच्या झुंजूमुंजूतच ह्या महिला बियाणे दुकानासमोर येऊन रांगा लावून बसत आहेत. काही ठिकाणी तर बियाण्याकरिता ह्या महिलांमध्ये हाणामारी ही झाली आहे. त्यातच बियाणे विक्रेते अवाच्या सेवा दर लावून नफा खोरी करीत आहेत. अवघ्या ८५० रुपयांचे हे बियाणे १५०० रुपयात चोरट्या मार्गाने विकल्या जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना बियाणे मिळण्याची मोठी मारामार सुरू आहे. याबाबत शासनाकडे कैक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांचा निपटारा होताना दिसत नाही. अशी बोलवा आहे कि, कृषी अधिकाऱ्यांचे हात बियाणे विक्रेत्यांकडून ओले केले जात असल्याने बियाणे प्रश्न शेतकऱ्यांचे जीवावर उठला आहे.
अशा स्थितीत शेतकरी वर्ग बियाण्याच्या शोधात भटकंती करीत आहे. अशातच आकोट तालुक्यातील मरोडा येथील योगेश हरिदास गावंडे वय ३० वर्षे, शिवम गणेश गावंडे वय २४ वर्षे, महेश उर्फ लड्डू गजानन गावंडे वय २१ वर्षे, चेतन अजय गावंडे वय ३० वर्षे आणि अक्षय विठ्ठल गावंडे वय ३० वर्षे हे पाच युवक बियाण्याचे शोधार्थ यवतमाळ येथे जाण्यास निघाले.
परंतु अमरावती येथून यवतमाळ मार्गावरील लोहारा घाटात काळ त्यांची प्रतीक्षा करीत असल्याचे त्यांना माहीतच नव्हते. या घाटात या युवकांचे वाहन खाली उतरत होते. समोरून एक बस आणि तिचे मागे टाटा नेक्सन ही वाहने येत होती. अशा स्थितीत टाटा नेक्सन ह्या वाहनाने भरधाव वेगाने समोरील बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. इतक्यात या युवकांचे वाहन समोरून येत होते. टाटा नेक्सन चा अंदाज चुकला आणि समोरचे वाहन पाहून त्याने आपले वाहन नियंत्रणात आणण्याचा प्रयास केला. परंतु काळाने अचूक वेळ साधली आणि दोन्ही वाहनांची टक्कर झाली.
या टकरीत योगेश हरिदास गावंडे हा जागीच ठार झाला. हे आघटित पाहून अनेक मदतीचे हात पुढे सरसावले. त्यांनी जखमींना ताबडतोब अमरावती येथील ईर्विन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे प्रथम उपचार नंतर जखमी युवकांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. येथे उल्लेखनीय आहे कि, या अपघातात ठार झालेल्या योगेश चे वडील हरिदास विश्वनाथ गावंडे यांचा पंधरा दिवसांपूर्वीच हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे.
या अपघाताने या कुटुंबातील दुसरा कर्ता पुरुषही काळाने हिरावला आहे. या घटनेने मरोडा परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. यासोबतच संपूर्ण आकोट तालुक्यात शासनाच्या गैर कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे बियाणे आकोट शहरातच उपलब्ध करून दिल्या गेले असते तर या युवकाचा जीव गेला नसता अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यासोबतच केवळ राजकीय कामांकरिता जनतेला वेठीस धरणारे जनप्रतिनिधी अशा गंभीर मुद्द्यावर मात्र मौन धारण करतात त्याबाबतही लोकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.