यवतमाळ नगर परिषदेच्या अतिक्रमण व प्लॅस्टिक विरोधी मोहिमेच्या कार्यवाहीचा सपाटा सुरु असुन मागील आठवडाभरात शहरातील विविध ठिकाणी या मोहिमेंतर्गत अतिक्रमण काढण्यासह दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. स्वतः मुख्याधिकारी या कार्यवाहीत पुढाकार घेत असुन नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांविरुध्द कार्यवाही सुरुच ठेवण्याची भुमिका घेत स्वतः मुख्याधिकारी पुढाकार घेत असल्याने पथकातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. व्यायसायीक-व्यापारी व नागरिकांनी या कार्यवाहीचा धसका घेतल्याचे दिसून येत आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत ४०० वर अतिक्रमणे काढल्याचे कळविण्यात आले आहे.
आजच्या कार्यवाही सत्रात शहरातील गजबजलेली बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी मार्केट, सराफा बाजार परिसरात अतिक्रमण काढण्यात आले. या भागातील बऱ्याच व्यावसायिकांनी दुकाना बाहेर विक्रीच्या वस्तुंचा पसारा ठेवण्यासाठी अनाधिकृत शेड उभारले त्यामुळे अरुंद झालेले रस्ते मोकळे करण्यात येउन यापुढे अतिक्रमण केल्यास संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी श्री दादाराव डोल्हारकर यांनी दिला आहे.
अतिक्रमण विरोधी ताफा टांगा चौकात पोहचताच मुख्याधिकारी डोल्हारकर यांनी गुरुकृपा ट्रेडर्स या प्लॅस्टिक विक्रेत्याची झाडाझडती घेतली. वापरावर बंदी असणाऱ्या प्लॅस्टिक पन्नी आढळुन आल्याने त्या जप्त करुन प्लॅस्टिक विरोधी नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदर विक्रेत्याकडुन ५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्याऱ्या पथकात आरोग्य विभागतील सर्वश्री प्रफुल्ल जनबंधु, राहुल पळसकर, अमोल पाटील, साजीद खांन, शंकर घोडे, विजय ऊके, प्रविण तांबेकर आदींचा सहभाग होता.