रामटेक 🙁 प्रतिनिधी)
रामटेक येथिल काष्ठशिल्पकार सेवक नागपूरे यांनी तान्हा पोळ्यानिमित्त लहान मुलांसाठी लाकडी बैल बनविलेले आहे.लाकडी बैल हे रामटेकच्या नागरिकांसाठी आकर्षनाचे केंद्र बनलेले आहे. वर्षभर राब-राब राबून देशाला खाद्यान्न पुरविणाऱ्या बळीराजा शेतकऱ्याचा पोळा हा एक अत्यंत महत्वाचा सण असतो.
या सणाला काबाळकष्टी शेतकरीराजा आपल्या काबाळकष्टी पोशिंद्या बैलाला सजवून धजवून त्याची पूजा करतो.पोळा म्हटला की शेतकरी आणि बैलांसाठी वर्षभरातला सर्वात महत्त्वाचा दिवस असतो.असा हा शेतकरीप्रिय पोळा सण लवकरच समोर येऊन ठेपला आहे.त्यानिमित्ताने रामटेक येथे काष्ठशिल्पकारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
बैल पोळ्याच्या दुसर्या दिवशी लहान मुलांसाठी तान्हा पोळा हाही बैलपोळाइतकाच महत्त्वाचा सण ! बळीराजा शेतकऱ्याची लहान मुले तान्हा पोळ्याला लाकडी बैलांशी खेळतात.यानिमित्ताने चिमुकल्यांना जणूकाही शेती आणि बैलाची लहानपणातच ओळख होत असते. त्यासाठी रामटेक येथील काष्ठशिल्पकार सेवक नागपुरे यांनी मुलांसाठी लाकडी बैल बनविले आहेत.
नागपुरे यांनी आपल्या कला- कौशल्याने अत्यंत मेहनत घेऊन सुंदर आणि आकर्षक लाकडी बैल निर्माण केले असून रामटेक शहरात त्यांची मोठी चर्चा आहे.शहरातल्या नागरिकांसाठी हे बैल आकर्षणाचे केंद्र बनले असून येणाऱ्या तान्हापोळा सणाला या लाकडी बैलांची मोठी मागणी होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.विशेष म्हणजे रामटेक हा धानाच्या उत्पादनासाठी विख्यात असलेला तालुका आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी त्यामुळे बैलजोडी ही असतेच ! येथील शेतकऱ्यांचा रात्रंदिवस बैलांशी संबंध असतो.यामुळे पोळा व तान्हा पोळा हा सण शहरातील,तालुक्यातील नागरिकांसह लहान मुलांसाठी खास महत्त्व ठेवतो.