जिल्हा स्तरीय सरस प्रदर्शनी “नागरत्न” महोत्सवाचे थाटात उदघाटन..
नागपूर – शरद नागदेवे
नागपूर :- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समुहांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनीचे शुक्रवारी सिव्हील लाईन्स परिसातीतल दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र येथे मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात उदघाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकड्डे, माजी अध्यक्षा रश्मीताई बर्वे, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती राजकुमार कुसूंबे, समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे, उपायुक्त (विकास) डॉ. कमलकिशोर फुटाणे, उपायुक्त (आस्थापना) विवेक इलमे, प्रकल्प संचालक वर्षा गौरकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनोज गोस्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) विपुल जाधव, कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर, भागवत तांबे, संजय वानखेडे, डॉ. कविता मोरे, व्हीआयएच्या अध्यक्षा पुनम गाला आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या विविध वस्तू म्हणजे बाजारपेठेतील एक विश्वसनीय ब्रँड असल्याचे गौरवोदगार काढून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे, उपायुक्त (विकास) डॉ. कमलकिशोर फुटाणे, उपायुक्त (आस्थापना) विवेक इलमे यांनीही आपले विचार व्यक्त केले व महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक वर्षा गौरकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन एमआरएलएमचे प्रकल्प व्यवस्थापक शेखर गजभिये यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने बचत गटांच्या महिला व जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तीन दिवस कार्यक्रम व चविष्ट पदार्थांची रेलचेल. २४ मार्च ते २६ मार्च तीन दिवस चालणाऱ्या या “नागरत्न” महोत्सवात तिन्ही दिवस सायंकाळी ६ पासून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी २६ मार्च रोजी सायंकाळी सुप्रसिद्ध गायक निरंजन बोबडे व इतर प्रसिद्ध कलावंत यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनात ६८ महिला बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले असून यामध्ये १७ स्टॉलवर अस्सल वऱ्हाडी व चविष्ट भोजन व खाद्य पदार्थ उपलब्ध राहणार आहेत.
तसेच उर्वरित स्टॉलवर नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समुहांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू उपलब्ध राहणार आहेत. नागपूर शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी, जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहपरिवार या सरस प्रदर्शनीला भेट देऊन महिला बचत गटांचा उत्साह वाढविण्याचे आवाहन कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी केले आहे.