न्युज डेस्क – पुरुषांच्या कबड्डी लीगच्या यशानंतर आता भारतात महिला कबड्डी लीगला लोक मोठ्या प्रमाणात पसंद करीत आहे. म्हणूनच आता महिला कबड्डी लीग (WKL) दुबईत सुरू होत आहे.
ही एक भारतीय स्पर्धा आहे पण तिचा पहिला हंगाम UAE मध्ये खेळवला जाईल. ही भारतातील पहिली महिला कबड्डी लीग असून ती 16 जूनपासून सुरू होणार आहे. लीगचे सर्व सामने दुबईतील शबाब अल-अहली स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहेत.
महिला कबड्डी लीगमध्ये 8 संघ सहभागी होणार आहेत. त्यांच्या नावांमध्ये राजस्थान रायडर्स, दिल्ली डायनामाईट्स, गुजरात एंजल्स, ग्रेट मराठा, हरियाणा हसलर्स, पंजाब पँथर्स, उमा कोलकाता आणि बेंगळुरू हॉक्स यांचा समावेश आहे.
ही स्पर्धा 12 दिवस चालणार आहे. या लीगचा अंतिम सामना २७ जून रोजी होणार आहे. राऊंड रॉबिननंतर प्लेऑफचे सामने खेळवले जातील. एपीएस स्पोर्ट्सतर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे.
या लीगमध्ये 120 हून अधिक भारतीय आणि विदेशी महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. नुकत्याच झालेल्या लिलावात अनेक अव्वल खेळाडूंसाठी ऐतिहासिक बोली लावली गेली, ज्यामध्ये एकाच खेळाडूसाठी सर्वाधिक 33 लाख रुपयांची बोली लागली.
लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुमार नेहरा म्हणाले की, महिला कबड्डी लीगच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देणे, हा या लीगचा मुख्य उद्देश आहे. हरविंदर कौर आणि मोती चंदन सारखे दिग्गज खेळाडू लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत.