मुंबई – धीरज घोलप
मुंबईत मांजरीच्या मागे लागणाऱ्या कुत्र्यावर एका महिलेने अॅसिड हल्ला केल्याची अजब घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाली आहे. एकतर्फी प्रेमातून मुलींवर अॅसिड होण्याच्या घटना नव्या नाहीत.
पण मुंबईत मांजरीच्या मागे लागणाऱ्या कुत्र्यावर अॅसिड हल्ला झाल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, मुंबई पश्चिम उपनगरातील मालाड मालवणीत ही घटना घडली आहे. आरोपी 35 वर्षीय महिला येथील सामनानगर भागातील स्वप्नपूर्ती इमारतीत राहते. सबिस्ता सुहेल अन्सारी असे तिचे नाव आहे. त्यांनी बुधवारी रात्री उशिरा कुत्र्यावर अॅसिड हल्ला केला.
सबिस्ता सुहेल अन्सारी यांनी आपल्या घरात मांजर पाळली आहे. एक कत्रा या मांजरीसोबत खेळतो. तिच्या मागेही लागतो. याचा राग आल्यामुळे या महिलेने त्याच्यावर अॅसिड हल्ला केला. या घटनेत कुत्रा जबर जखमी झाला असून, त्याच्यावर पशूवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यात कुत्र्यांला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचा 1 डोळा निकामी झाला असून, शरीरावरही गंभीर जखमा झाल्या आहेत. टीव्ही अभिनेत्री जया भट्टाचार्य यांनी या श्वानाला त्यांच्या थँक यू अर्थ या एनजीओमध्ये नेले. त्यानंतर त्याला पशूवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुसरीकडे, या प्रकरणी बाळासाहेब भगत नामक व्यक्तीने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, हा कुत्रा मागील 5 वर्षांपासून इमारतीत राहते. बुधवारी 12.30 च्या सुमारास मला सोसायटी कार्यालयात जाताना कुत्र्याच्या भुंकण्याचा व विव्हळण्याचा आवाज आला. त्यानंतर आम्हाला कुत्र्यावर अॅसिड हल्ला झाल्याची बाब समजली.
महिलेवर गुन्हा दाखल
आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात सबिस्ता अन्सारी यांनी बॉटलमधून अॅसिड फेकल्याचे दिसून आले. या प्रकरणी सोसायटीच्या अध्यक्षांनी अॅसिड अटॅक करणाऱ्या महिलेविरोधात मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.