गोकुळ शिरगाव – राजेद्र ढाले
उचगाव (ता. करवीर) हेल्पर्स ऑफ दि हॅन्डीकॅप्ड या संस्थेच्या वतीने येथील घरोंदा वसतिगृहात राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे गावातील दिव्यांग अर्चना सुतार व विकास सुतार यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. आनंदाने भारलेल्या लग्न मंडपात दिव्यांग मुला -मुलींची, नातेवाईक यांची उपस्थिती शुभ मंगल सावधान साठी अक्षदा रुपी आशीर्वादासाठी तुडुंब भरून गेले होते.
आमजाई व्हरवडे येथील सुतार कुटुंबातील एकाच घरात तिघांना स्नायू विकृती आजार होता. सुतार कुटुंबियांची हेल्पर्स संस्थेच्या प्रतिनिधिनी भेट घेतली. अर्चना व आनंदा या भावंडांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिची आई १५ वर्षांपासून झोपून होत्या. वडील व्यसनाधीन होते. दोघा भावडांना शालेय शिक्षणही पूर्ण करता आले नाही. स्वत: पराकोटीचे अपंगत्व असूनही अर्चनाने घराची संपूर्ण जबाबदारी आपल्या खाद्यावर घेतली.
मार्च २०१६ मध्ये हेल्पर्सने अर्चना सुतार हिला शिलाई मशीनला मोटर बसवून दिली. यामुळे तिच्यासाठी शिवणकाम थोडेसे सुलभ झाले. संस्थेकडून नियमितपणे मदत पाठवली जाऊ लागली. या दरम्यान आई व वडील दोघांचाही मुर्त्यू मनाला चटका लावून गेला. फक्त बहीण-भाऊ यांच्या पाठीशी संस्था उभी राहिली. हेल्पर्समध्ये मोठ्या उत्साहात अर्चना तिच्याच गावातील विकास या सुदृढ तरुणाशी विवाहबद्ध झाली. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या विकास सुतार याची या भावंडांशी ओळख झाली आणि हे तिघे एकमेकांची काळजी घेऊ लागले. यातूनच अर्चना आणि विकास यांची प्रेमकहाणी आकाराला आली.
संस्थेच्या वतीने वधूवर सूचक विभागामार्फत वैद्यकीय सल्ला व समुपदेशन करण्यात आले. त्यांचा रजिस्टर पद्धतीने विवाह संपन्न झाला. त्यानंतर हेल्पर्स कुटुंबाच्या वतीने वैदिक पद्धतीने हा विवाह सोहळा धुमधडाक्यात झाला. या विवाह सोहळ्यासाठी अनेक हितचिंतक व देणगीदारांनी प्रतिसाद दिला. हेल्पर्सने घेतलेला हा विवाह संकल्प सर्वांच्या सहाय्याने सिद्धीस गेला. या विवाह सोहळ्यास अर्चना व विकास यांचे नातेवाईक, संस्थेचे हितचिंतक व देणगीदार, संस्थेचे पदाधिकारी व सर्व स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळासाठी देणगी दार यांनी मेहेंदी, हळदी, संगीत आणि विवाह यांमध्ये सहभाग घेतला. सर्वांनी नवदाम्पत्याला भरभरून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.