आकोट- संजय आठवले
नुकत्याच पार पडलेल्या आकोट पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत सेना, भाजप, काँग्रेस आणि प्रहार या महायुतीने गत २७ वर्षापासून दबदबा असलेल्या वंचित आघाडीच्या सत्तेला उलथवून टाकले असून सभापतीपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा तर उपसभापती पदी भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. या विजयाकरिता राज्याच्या राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहणारे वैरी आकोट मुक्कामी मांडीला मांडी लावून बसल्याने आणि या बैठकीत काँग्रेसही सक्रिय सामील झाल्याने या अनैसर्गिक युतीबाबत चर्चेला प्रचंड उधाण आले आहे.
आकोट पंचायत समितीमध्ये एक दोन अपवाद वगळता गत २७ वर्षापासून वंचित आघाडीची सत्ता राहिलेली आहे. दर निवडणुकीत अचूक जातीय समीकरणे मांडून वंचित आघाडी येथे सत्ता काबीज करीत आलेली आहे. त्या सातत्याला भेदण्याचे काम यावेळी सेना, भाजप, काँग्रेस व प्रहार या महायुतीने केले आहे. या महायुतीकडून सभापती पदाकरिता हरीदिनी अशोक वाघोडे यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली. तर उपसभापती पदाकरिता भाजपकडून संतोष बाळाभाऊ शिवरकर यांना नामनिर्देशित करण्यात आले. वंचित आघाडी कडून सभापती पदाकरिता सपना ईश्वरदास झ्यासर यांना तर उपसभापती पदाकरिता सौ शाह इम्तियाज बी मुश्ताक यांना उमेदवारी देण्यात आली. या लढतीमध्ये महायुतीने ९/९ मते प्राप्त केलीत.
तर वंचित आघाडी उमेदवारांना ७/७ मते मिळालीत. त्यामुळे महायुतीच्या हरीदिनी अशोक वाघोडे ह्या सभापती पदाकरिता तर संतोष बाळासाहेब शिवरकर हे उपसभापती पदाकरिता विजयी घोषित करण्यात आले.
ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने मात्र काही बाबी ठळकपणे समोर आल्या आहेत. त्यातील सर्वाधिक महत्त्वाची आणि इतिहासात नोंदविली जाणारी बाब म्हणजे भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांच्या दिलजमाईची. राज्यात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करण्याकरिता देवेंद्र फडणवीस यांनी साम, दाम, दंड, भेद नितीचा टोकाला जाऊन अवलंब केला. मात्र त्याच देवेंद्र फडणवीस यांनी आता अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आकोट पंचायत समितीमध्ये उद्धव ठाकरे गटाचा सभापती होण्यासाठी हिरवा कंदील दिला. त्यात आश्चर्याची बाब म्हणजे भाजपचा उपसभापती होण्यासाठी आकोट तालुक्यातील काही काँग्रेस नेत्यांच्या सक्रिय सहभागाने काँग्रेस उमेदवाराने मतदान केले. असे होण्यासाठी कारणीभूत ठरले वंचित सुप्रीम बाळासाहेब आंबेडकर आणि तालुक्यातील काँग्रेस नेते हिदायक पटेल यांच्यातील वितुष्ट आणि बाळासाहेब आंबेडकर यांची हेकेखोरी.
वास्तवात वंचित व काँग्रेस यांचेमध्ये हिदायत पटेल गटाचा हा काँग्रेस उमेदवार वंचितला देण्याबाबत चर्चा झाली होती. त्या चर्चेत काँग्रेसने उपसभापती पदाची मागणी केली होती. मात्र युती न करता तथा उपसभापती पद न मागता काँग्रेस उमेदवाराने आपल्या सोबत यावे असे वंचितने स्पष्ट केले. तसे झाले असते तर या ठिकाणी किमान ८/८ मते होऊन ईश्वर चिठ्ठीद्वारे काहीतरी पदरात पडले असते. पण कुणाशीच युती करायची नाही व कुणालाच सत्तेत सहभागी करून घ्यायचे नाही या हटवादामुळे ही बोलणी खुंटली. आणि वंचितला आपल्या २७ वर्षांच्या सत्तेला मुकावे लागले. सोबतच अकोला जिल्ह्यातील आकोट येथून काँग्रेस आणि वंचितच्या मैत्रीच्या होणाऱ्या शुभारंभासही गालबोट लागले.
असे असले तरी मात्र काँग्रेसने उपसभापती पदाकरिता भाजपला मदत न करता तटस्थ रहावयास हवे होते असे काही काँग्रेस जणांचे म्हणणे आहे.
आगामी काळात ह्या अभद्रपणाचे पडसाद उमटणार असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. मात्र भविष्यातील हे भविष्य भविष्यकाळ ठरविणार असला तरी वर्तमान काळात मात्र सेना, भाजप आणि काँग्रेस यांनी प्रहारला हाताशी धरीत सत्तेची देवाणघेवाण करून वंचितला सत्तेपासून वंचित केले हे वास्तव स्वीकारल्याखेरीज अन्य पर्याय नाही.