बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर येथील शाळा खोलीच्या निकृष्ट बांधकाम प्रकरणात कारंजा रमजानपूरचे ग्रामसेवक प्रमोद उगले व जि.प.बांधकाम उपविभाग बाळापूरच्या कनिष्ठ अभियंता पुजा आठवले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील मनमानी कारभार चव्हाट्यावर आला असून वरिष्ठ अधिकारी आणखी किती लोकांना घरी पाठविणार असा प्रश्न सर्वसामान्य जनता प्रशासनाला विचारत आहेत.
या बांधकामाबाबत गावातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर बांधकाम विभागाने केलेल्या तपासात या तिघांना नोटीस पाठवून त्यांचा खुलासा मागण्यात आला होता.पत्र त्यातील दोघांनाच दोषी ठरवीत जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बुधवार दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी निलंबनाचे आदेश काढले आहेत.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंर्तगत या शाळा खोलीचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु,अवघ्या दहा दिवसातच या खोलीचे छत कोसळले. या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी २७ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी यांच्याकडे तक्रार केली होती.
त्यांनी या कामाची चौकशी करण्याचे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला आदेश दिले होते. त्यावर बांधकामच्या कार्यकारी अभियंत्यांनी जि.प.बांधकाम उपविभाग बाळापूरचे उप अभियंता किशोर ठेंग, कनिष्ठ अभियंता पुजा आठवले व ग्रामसचिव प्रमोद उगले यांना कारणे दाखवा नोटीस देवून खुलासे मागितले होते.
त्यानुसार ह्या तिघांनीही आपापले खुलासे सादर करून ते या बाबतीत अनभिज्ञ असून सदरहू कामाशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे खुलाश्यातून स्पष्ट केले होते.मात्र या प्रकरणांत कनिष्ठ अभियंता व ग्रामसेवक प्रमोद उगले यांचा खुलासा मान्य न करता ह्या दोघांनाही कार्यकारी अभियंत्याच्या शिफारशी वरून निलंबित करण्यात आले आहे.तर उपअभियंता किशोर ठेंग यांना वाचविण्यात आले आहे.
वास्तविकता अशी आहे की निलंबित करण्यात आलेल्या दोघांचाही ह्या कामाशी दुरान्वयानेही कोणताच संबंध नव्हता.ह्या दोघांचे निलंबन म्हणजे “चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचाच” हा प्रकार आहे.यातील खऱ्या आरोपी असलेल्या कुणाला तरी वाचविण्यासाठी ह्या दोघांचा बळी देण्यात आल्याची जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चा आहे.
गावांत होणाऱ्या कोणत्याही कामाबाबत सरपंच यांना विश्वासात घ्यावे लागते,किमान त्यांना याची माहिती देणे बंधनकारक आहे. परंतु,कारंजा रमजानपुर गावात शाळेची खोली बांधण्यात येत असताना या कामाबाबत कोणतीच माहिती सरपंच यांना देण्यात आली नाही. कामाची निविदा,इस्टिमेट,वर्कआर्डर इतकेच काय तर कामाचे भूमिपूजन करताना सुद्धा सरपंच यांना बोलावण्यात आले नाही.
संबंधित ठेकेदाराने काम सुरु केल्यानंतर हे बांधकाम जि.प.बांधकाम विभागातून काढण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कुणीही कोणताच आक्षेप घेतला नाही. सरपंच यांनी देखील आपल्या पदाचा मान सन्मान बाजूला ठेवून सहकार्य केले.
परंतु, अवघ्या दहा दिवसातच ह्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाने शाळेच्या वर्ग खोलीचे छत कोसळल्याने सरपंच व गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ह्या कामाची तक्रार केली असता त्यांनी कार्यकारी अभियंत्याला बोलावून ह्याबाबत अहवाल मागितला.
प्रभारी कार्यकारी अभियंता इंगळे ह्यांनी घोंगळे झटकून ज्यांचा ह्या बांधकामाशी आणि टेंडर प्रक्रियेशी काहीच संबंध नसलेल्या ग्रामसेवक व कनिष्ठ अभियंता ह्यांना बळीचा बकरा बनविल्याची चर्चा आहे.या प्रकरणात करण्यात आलेली कारवाई नि:पक्ष नसून,यात ज्यांचा काहीच दोष नाही अशांना अडकवन्यात आल्याचा आरोप कारंजा रमजानपूर सरपंच कोगदे ह्यांनी केला आहे.
बांधकाम विभागातील काही बडी धेंडे ह्या निमित्ताने संशयाच्या भोवर्यात आली असून ज्या गावात कामे केल्या जातात त्या गावाच्या सरपंच व ग्रामसेवक यांना अंधारात ठेवून परस्पर ठेकेदाराला काम देवून कामाचे नियोजन करणे,कामाला मंजूरात देणे,परस्पर निविदा मॅनेज करून कंत्राटदाराला वर्कऑर्डरही देणे हे कोणत्या नियमात बसते.? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कारंजा रमजानपूर मधील शाळेचे छत कोसळल्या प्रकरणी करण्यात आलेली निलंबनाची कारवाई चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याची जि.प.च्या आवारात चर्चा असली तरी ती करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी मात्र त्यावर फेरविचार करण्यासही तयार नसल्याचे समजते.ह्या प्रकरणांत उप अभियंत्यावर कोणतीही कारवाई न करता व कारवाईचा प्रस्ताव न पाठवता त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रभारी कार्यकारी अभियंता इंगळे ह्यांची ह्या प्रकरणातील भूमिका मात्र संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रभारी कार्यकारी अभियंता इंगळे ह्यांचा कारभार चांगलाच चर्चेत आलेला असून त्यांना लवकरच बांधकाम विभागाचा प्रभार सोडावा लागणार असल्याची चिन्हे अगदी स्पष्टपणे दिसत आहेत.तर ह्यापूर्वी प्रभारी म्हणून उभ्या उभ्या प्रभार सोडणारे मूर्तिजापूरचे उपअभियंता प्रकाश उमाळे ह्यांची ह्या पदावर पुन्हा वर्णी लागणार असल्याच्या जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा आहेत