RBI : 19 मे 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2,000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली. यासोबतच या 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि जमा करण्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण 4 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी या नोटा वेळेत जमा कराव्यात किंवा बदलून घ्याव्यात, असे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.
2000 च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आता 5OO च्या नोटा देखील चलनातून बाद करतील की काय ? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. काही लोकांच्या मनात असाही प्रश्न आहे की 2000 ची नोट काढून घेतल्यानंतर RBI पुन्हा एकदा 1000 रुपयांची नवी नोट जारी करणार का? सोशल मीडियावरही याबाबत अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या मिटिंग नंतर पत्रकार परिषदेत, आरबीआय गव्हर्नरना सामान्य लोकांशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला की आरबीआय 2000 च्या नोटांप्रमाणे 500 च्या नोटा देखील चलनातून बाहेर पडतील का? नवीन 1000 च्या नोटा जारी होणार? या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, माझ्याकडे अशी कोणतीही माहिती नाही. यासोबतच सध्या असा कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे अशा प्रकारच्या चर्चाच्या संदर्भात त्यांनी सर्वसामान्यांना विशेष आवाहन करत अशा अफवांवर लक्ष देऊ नये, असे सांगितले.
आतापर्यंत 2000 च्या जवळपास 50% नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत.
RBI गव्हर्नरने पत्रकार परिषदेत असेही सांगितले की 31 मार्च 2023 पर्यंत एकूण 3.62 लाख कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा चलनात होत्या. त्याचवेळी, या नोटा बाद करण्याच्या निर्णयानंतर, आतापर्यंत सुमारे 50% म्हणजेच 1.80 लाख कोटी किमतीच्या दोन हजाराच्या नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. आपल्या तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर, RBI ने रेपो दरात कोणताही बदल न करण्याची घोषणा केली आहे.