गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सातत्याने महाराष्ट्रातील नागरिकांना दुखावणारी वक्तव्ये करत असल्यानं त्यावर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचा इशारा दिल्यानंतर राज्यपाल पदमुक्त होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यावर केलेल्या वादग्रस्त नंतर मुंबईतून गुजरातींचा पैसा काढून घेतला तर काही उरणार नाही, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत नुकतंच केलेलं वक्तव्य… यावरून महाराष्ट्रातील नागरिकांनी तसेच विविध संघटनांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. वेळोवेळी राज्यपालांना पायउतार करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
यावर खासदार संजय राऊत यांनी म्हटले , “राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली.आवाज शिवसेनेचाच!….जय महाराष्ट्र!”
छत्रपती शिवरायांची तुलना शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्याशी केल्यानंतर यावेळी महाविकास आघाडी राज्यपालांविरोधात आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारमधील भाजपने यावर तत्काळ भूमिका घेऊन, महाराष्ट्रातून या राज्यपालांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे.
महाविकास आघाडीचे यावर एकमत असून लवकरच या मागणीसाठी आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र बंद’ केला जाईल, असे संकेत उद्धव ठाकरेंकडून देण्यात आले होते. मात्र या संपूर्ण घटनाक्रमाला आता कलाटणी मिळाल्याचे दिसत आहे. राज्यपालांनाच महाराष्ट्रात या पदावर राहण्याची इच्छा नसल्याचे पुढे आले आहे.