Monday, December 23, 2024
Homeसंपादकीययेणाऱ्या निवडणुकीत पुन्हा त्यांनाच का निवडून द्यायचं?...मूर्तिजापूरकरांना पडलेला प्रश्न?...भाग १

येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा त्यांनाच का निवडून द्यायचं?…मूर्तिजापूरकरांना पडलेला प्रश्न?…भाग १

काल परवा राज्य निवडणूक आयोगाच पत्रक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालंय, राज्यातील अनेक मिडियांनी निवडणूक लागणार अश्या बातम्याही केल्यात, मात्र सायंकाळी राज्य आयोगानं खुलाश्याच पत्र टाकून भावी नगरसेवकांचा हिरमोड केला. तर लवकरच निवडणुका जाहीर होतील अशी स्वताची समजूत काढत भावी नगरसेवक पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत.

आता निवडणुका कधी होणार?, गेल्या दीडवर्षा पेक्षा जास्त कालावधी निघून गेला तरीही निवडणुका लागण्याचे नाव घेत नाही, त्यामुळे बरेच भावी नगरसेवक कासावीस झाल्याचे पाहायला मिळत आहेत. तर मी भाऊच्या अगदी जवळचा आहो मलाच तिकीट मिळणार असल्याचे अनेकजण फुसारक्या मारतांना दिसतात, तर काही नगरसेवक तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांचे वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरे करून त्यांचे फोटो सोशल मिडीयावर सर्रासपणे टाकतात.

एवढच काय शहरात अनेक ठिकाणी काही आजी माजी नगरसेवकांनी ज्या कामाची गरज नाही त्या कामाचा सपाटा सुरु केला असून आपल्या वार्डात भाऊच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजनाचे कार्यक्रम सुरु केले आहेत. कामाचा निधीही हा 20 लाखांच्या वरच असतो आणि ठेकेदार पण हेच असतात किंवा दुसर्याच्या नावावर काम घेवून स्वतः काम करतात, कारण त्यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी पैसा गोळा करावा लागतो…

निवडणुकीपूर्वी मी किती मोठा समाज सेवक आहो हे दाखवावं लागते, मग त्यासाठी संधी शोधात बसतात. जसे की, भावी नगरसेवकाच्या प्रभागात जर एखाद्या मयत झाला तर ही सर्वात मोठी संधी त्या भावी नगरसेवकाकडे असते, हा पठ्ठ्या एखादा घरच्या सदस्या सारखा झटत असतो, एवढंच काय तर अंत्ययात्रा सुरू असताना समोर मडकं घेऊन चाललेल्या मयताच्या मुलाच्या हातचं मडकं हाती घ्यायला मागेपुढं पाहत नाही. एवढे नौटंकीबाज नगरसेवक इथं पाहायला मिळतात.

आपल्या अकोला जिल्ह्याची ही एक प्रथाच झाली, कारण जिल्ह्याचे मोठे नेते हेच काम करतात, मयत, तेरवी, लग्न हे त्यांचे आवडते कार्यक्रम मग विकास गेला चुलीत, त्यांचंच अनुकरण हे खालचे कार्यकर्ते करतात. बर निवडून आल्यावर जर वार्डात एखादा मयत झाला तर हा बहाद्दर हात बांधून लोकांमध्ये होबासक्या करतांना दिसतो…

तर काही एवढे प्रसिध्द पिसाट कार्यकर्ते आहेत की, सोशल मीडियावर त्यांच्या वार्डातील कामाचे फोटो बिन्दास्त टाकतात, फोटो बघून कोणालाही स्तुती करावी वाटत नाही, कारण एवढे फालतू फोटो ते सोशल मीडियावर टाकतात. बर एवढे फोटो टाकूनही काय फायदा, तुम्ही जे काय मागील पाच वर्षात केलंय ते लोकांना दिसत नाही का?, तुमच्या कारकिर्दीत जागतिक दर्जाचा शहरातील मुख्यरस्ता सर्व काही सांगतो. एवढंच काय तर देशात, राज्यात, शहरात तुमचीच सत्ता होती मग पाणीप्रश्न का सोडवला नाही? मग येणाऱ्या निवडणुकीत तुम्हालाच का निवडून देतील? असे अनेक प्रश्न मूर्तिजापूरकरांच्या मनात आहेत ते आपण येथे पाहूया…क्रमश

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: